अमरावती : छान पहाड, निसर्ग सौंदर्य यामुळं अनेक सिनेमांचं शूटिंग हे महाबळेश्वरला होतं. 'नाळ दोन' या चित्रपटाचं शूटिंग आम्ही माळशेज घाटात केलं. आता चार दिवस मी मेळघाट फिरलो. हा परिसर अतिशय घनदाट जंगलाचा आणि फारच सुंदर आहे. आमच्या पुढच्या चित्रपटासाठी मेळघाटमध्ये शूट करण्याचा विचार निश्चित केला जाईल असं नाळ चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी म्हटलंय. चार दिवसांच्या मेळघाट सफारीनंतर त्यांनी खास "ईटीव्ही भारत"शी संवाद साधला.
चार दिवस नॉट रिचेबल: "पहिल्या नाळ चित्रपटाची शूटिंग आम्ही भंडाऱ्याला केलं. त्यावेळी अमरावतीचे असणारे आमचे कास्ट डायरेक्टर प्रवीण इंदू यांनी मेळघाटबाबत सांगितलं होतं. मेळघाट पाहायला चला असं त्याचवेळी म्हटलं होतं. मात्र, आता आम्ही मुंबईत एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आणि जराशी सवड असल्यामुळं खास मेळघाटात फिरून आलो. मेळघाटचा परिसर अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलाने वेढला आहे. आंध्र प्रदेशात माझं गाव देखील जंगलानं वेढलेलं आहे. त्यामुळं जंगल मला फार आवडतं. मेळघाटातील जंगल मात्र प्रचंड विस्तीर्ण आणि घनदाट आहे. मेळघाटच्या जंगलात मोबाईल फोनला देखील रेंज नाही. चारही बाजूंनी उंच पहाड आणि दाट जंगल अशा ठिकाणी मोबाईल फोन बंद असल्यामुळं चार दिवस आम्ही नॉट रिचेबल होतो. हा एक आगळा वेगळा अनुभव होता" असं सुधाकर रेड्डी म्हणाले.
अस्वलीच्या हल्ल्याची कहाणी ऐकून वाटली भीती: "मेळघाटात आमचा मुक्काम अतिशय दुर्गम अशा जारीदा या गावात होता. या गावात 2010 मध्ये वनरक्षक म्हणून सेवा देण्यासाठी पहिल्यांदाच पोहोचलेले अभिषेक वाकोडे यांच्यासह आश्रम शाळेतील उपमुख्याध्यापक, एक विद्यार्थी आणि गुराखी अशा चौघांना अस्वलीनं एकाच दिवशी ठार मारल्याची थरारक कहाणी ऐकली. त्यावेळी प्रचंड भीती वाटली" असं देखील सुधाकर रेड्डी यांनी सांगितलं.
सिपना पटेल पहिल्याचा आनंद: "मेळघाटात चारही बाजूंनी सागवानाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. हे संपूर्ण जंगल जणू सागवानानच वेढलेलं दिसतं. जारिदापासून काही अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेल्या मांडू गावाच्या पलीकडं भारतातलं सगळ्यात जुनं असं सागवानाचं झाड आहे. त्याला सिपना पटेल असं म्हणतात. त्याबाबत माहिती मिळताच आम्ही सिपना पटेलला पाहायला गेलो. या ठिकाणी नदी ओलांडून जंगलात थोडं आतमध्ये पायी जावं लागतं. सिपना पटेल पाहण्यासाठी जातानाचा अनुभव आणि सिपना पटेल पाहतानाचा क्षण अविस्मरणीय आणि अतिशय आनंददायी होता", असं सुधाकर रेड्डी म्हणाले.