नागपूरDikshabhoomi Agitation : कोट्यवधी बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमी येथे २०० कोटीची विकासकामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात निर्माण होत असलेल्या भूमिगत पार्किंगला आंबेडकर अनुयायींनी तीव्र विरोध केलेला आहे. या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून दीक्षाभूमी स्मारक समिती आणि आंबेडकरी जनतेमध्ये चर्चा सुरू होती. आज त्या संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे संतप्त लोकांनी जोरदार तोडफोड करत जाळपोळ केली आहे. लोकांच्या संतप्त भावना लक्षात घेता राज्य सरकारने तत्काळ भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती दिल्याचं जाहीर केल्यानंतरच संतप्त जमाव शांत झाला आहे.
दीक्षाभूमीवरील आंदोलनाविषयी बोलताना नागपूरचे पोलीस आयुक्त (ETV Bharat Reporter) विकासकामांसाठी 130 कोटींचा कार्यादेश :पवित्र दीक्षाभूमी हे केवळ भारतातीलचं नाही तर जगातील कोट्यवधी बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. दीक्षाभूमी येथे लाखोच्या संख्येनं अनुयायी भेट देतात. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिवसासह विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. लाखोंच्या संख्येत अनुयायी येतात. त्यांच्यासाठी दीक्षाभूमी परिसरात निवास, भोजन, स्वच्छतागृह, परिवहनसह आवश्यक सुविधा उभारली जावी याकरता हरियाणा येथील गुडगावच्या वायएफसी-बीबीजी कंपनीला १३० कोटी रुपयांचा कार्यादेश दिला.
दीक्षाभूमी स्तूपास धोका, नागरिकांचा आरोप :दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. समस्या मार्गी लावण्यासाठी भूमिगत दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंग तयार केली जात आहे. मात्र, त्यामुळे दीक्षाभूमी स्तूपास धोका निर्माण होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. त्यामुळे आज उग्र आंदोलन करण्यात आलं.
दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती : दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते; मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीनं निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत केली आहे.
पोलिसांची दमछाक : दीक्षाभूमीवर हजारोच्या संख्येनं नागरिक एकत्रित येणार असल्याची माहिती पोलिसांना होती; मात्र विषय धार्मिक भावनेशी निगडित असल्यामुळेचं नागपूर पोलिसांनी अतिशय संयमाची भूमिका घेत सर्व नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लोकांनी निर्माणस्थल परिसरात तोडफोड करत जाळपोळ केली.
या सुविधा निर्माण केल्या जात आहेत : पवित्र दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी येणाऱ्या अनुयायींच्या मनोरंजनाची सोय केली जाणार आहे. त्यामध्ये संग्रहालय आणि खुले रंगमंच, कार्यक्रम व्यासपीठ बांधण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त चार प्रवेशद्वारांचे विस्तारीकरण, चार तोरणद्वारे नव्याने बांधण्यात येतील. सुरक्षा केंद्र, सीसीटीव्ही कॅमेरे, हायमास्ट लाईट्स, अग्निशमन, वातानुकुलन व्यवस्था इत्यादी कामांचा समावेश आहे.
हेही वाचा:
- ''उद्धव ठाकरे, संजय राऊत हे काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे लाचार'', अतुल भातखळकर यांची घणाघाती टीका - Atul Bhatkhalkar
- नीट परीक्षा पेपरफुटीतील लातूरमधील आरोपींचा आज सीबीआय घेणार ताबा, मोठे मासे गळाला लागणार का? - Latur NEEt Exam Scam
- पावभाजी विक्रेत्याला घातला सायबर गंडा, कर्जासाठी अॅपवर घेतली वैयक्तिक माहिती, नवीन कायद्यानुसार मुंबईत पहिला गुन्हा दाखल - Cyber Criminal Cheated Businessman