महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईकरांच्या 'अनारकली'चा मृत्यू, आता प्राणी संग्रहालयात पाहता येणार नाही हत्ती - ELEPHANT ANARKALI

मुंबईच्या प्रसिद्ध वीर माता जिजामाता भोसले उद्यानात असलेल्या 'अनारकली' हत्तीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यामुळं आता मुंबईकरांना उद्यानात हत्ती पाहता येणार नाही.

Elephant Anarkali Death
मुंबईकरांची अनारकलीचा मृत्यू (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2024, 5:20 PM IST

मुंबई : मुंबईत कुठे फिरायला जायचं म्हटलं तर, गेटवे ऑफ इंडिया, कमला नेहरू पार्क, बोरिवली नॅशनल पार्क आणि वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती आणि प्राणी उद्यान म्हणजेच मुंबईकरांची राणीची बाग असे ठराविक तीन-चार स्पॉट लगेच डोळ्यासमोर येतात. यात राणीची बाग ही मुंबईकरांची आणि बच्चे कंपनीची आवडती जागा. इथे वाघ, बिबटे, पेंग्विन, विविध प्रकारचे परदेशी पक्षी, प्राणी, अस्वल, वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतात.

मुंबईकरांना हत्ती पाहता येणार नाही: वीर माता जिजामाता भोसले उद्यानात 1977 पासून एक 'अनारकली' नावाची हत्तीण देखील होती. मात्र, वयाच्या 59 वर्षे या हत्तीणीचं निधन झाल्यानं आता अनारकलीची जागा रिक्त झाली आहे. त्यातच केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या 2016 च्या नियमाप्रमाणे यापुढे प्राणी संग्रहालयात हत्ती ठेवता येणार नसल्यानं, यापुढे मुंबईकरांना प्राणी संग्रहालयात हत्ती पाहता येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईकरांच्या अनारकलीचा मृत्यू (ETV Bharat Reporter)

उद्यानात लक्ष्मी आणि अनारकली: दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीर माता जिजामाता भोसले उद्यानात 'अनारकली' हत्तीण ही बच्चे कंपनीचे आकर्षण होती. मात्र, वयाच्या 59 व्या अनारकलीचं निधन झालं. आता अनारकलीच्या जागेवर नवीन हत्ती येणार नाही. राणीच्या बागेत 1977 पासून लक्ष्मी आणि अनारकली या दोन हत्तीणी मुलांना पाहता याव्यात म्हणून आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर एका नर हत्तीला देखील या उद्यानात आणण्यात आलं. मात्र, काही कारणास्तव नर हत्तीला पुन्हा केरळला पाठवण्यात आलं होतं. यातील लक्ष्मीचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. तर, काही दिवसांपूर्वी अनारकलीचं निधन झालं. अनारकलीच्या पोटात तब्बल दीडशे किलोचा गोळा असल्याचं शवविच्छेदनानंतर स्पष्ट झालं.

कायद्याप्रमाणे संग्रहालयात हत्ती ठेवण्यास बंदी : आता तुम्ही म्हणाल अनारकलीच्या जागी दुसरा हत्ती आणता येईल की, पण आता प्राणी संग्रहालयात हत्ती ठेवण्यास बंदी असल्यानं ते शक्य नाही. कारण, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या 2016 च्या कायद्याप्रमाणे देशातील कोणत्याही प्राणी संग्रहालयाला हत्ती ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. या कायद्यानुसार एखाद्या प्राणी संग्रहालयात जर सद्यस्थितीत हत्ती असेल तर तो कायम ठेवला जाईल. त्याची प्राणिसंग्रहालयाने देखभाल करावी. मात्र, त्या प्राणी संग्रहालयात नवा हत्ती आणला जाणार नाही. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या या नियमांमुळं आता मुंबईकरांना प्राणी संग्रहालयात यापुढे हत्ती पाहता येणार नाही. कारण नवीन कायद्यानुसार हत्तीला नैसर्गिक वातावरणातच ठेवण्याचा नियम केला आहे.



अनारकलीचा ट्यूमरमुळं मृत्यू :या संदर्भात आम्ही जिजामाता उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितलं, "अनारकलीचा ट्यूमरमुळं मृत्यू झाला. मात्र, तशा पद्धतीची कोणतीही लक्षणं अनारकलीमध्ये दिसली नाहीत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे अनारकलीच्या जागी आता नवा हत्ती देखील आणता येणार नाही. यात लहान मुलांचा हिरमोड होत असला तरी हा केंद्राचा नियम आहे. त्यात आम्ही काही करू शकत नाही. येत्या काही काळात राणीच्या बागेत सिंह आणि लांडगे आणले जाणार आहेत. यासाठीचा करार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे".

हेही वाचा -

  1. जागतिक हत्ती दिवस: मुंबईकरांची ६२ वर्षांची अनारकली! - World Elephant Day 2024
  2. हॅपी बर्थडे हत्ती... 'जागतिक हत्ती दिना'च्या पर्वावर कोलकासमध्ये खास सेलिब्रेशन - Elephant Day celebrated in Amravati
  3. जागतिक हत्ती दिन 2024 विशेष: झारखंडच्या हत्तीचं 'हे' वैशिष्ट्य ठरतंय खास, पलामू व्याघ्र प्रकल्पात आहेत 180 हून अधिक हत्ती - World Elephant Day 2024

ABOUT THE AUTHOR

...view details