वाशिम : भाजपा पक्षानं ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात वाशिम जिल्ह्यातील एकाही उमेदवाराचं नाव नसल्यानं इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. वाशिममधून तीन टर्म आमदार राहिलेल्या लखन मलिक यांचंही पहिल्या यादीत नाव नसल्यानं येथे भाजपा नवीन चेहरा देणार की पुन्हा एकदा त्यांनाच संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपाचे नेते संजय कुटे हे रविवारी वाशिम येथे आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानं सस्पेन्स वाढला आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपानं ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपानं जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र भाजपाचे चारवेळा आमदार राहिलेल्या उमेदवाराचं या यादीत नाव नाही. त्यामुळे त्यांच्या जागेवर नवा उमेदवार भाजपा देणार असल्याची चर्चा वाशिम शहरात रंगू लागली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानं आमदार लखन मलिक म्हणाले की, पक्षानं मला चार वेळा संधी दिली. आणखी एकदा संधी द्यावी, अशी माझी पक्षाला विनंती आहे. पक्ष जो आदेश देईल, त्या पद्धतीनं मी काम करेन, असंही ते म्हणाले.