ठाणेCash Robbery Case: राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना लुटण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यातही घडलेली आहे. अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीतील आठ जणांनी फिल्मी स्टाईलने पोलिसांचे पथक असल्याचे भासवून एका कुरिअर कंपनीच्या व्हॅनवर दरोडा टाकला. यानंतर त्यामधील ५ कोटी ४० लाखाची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील आठगाव हद्दीतील महामार्गावर 15 मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आठ दरोडेखोरांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री चार दरोडेखोरांना अटक केली गेली. उर्वरित चार दरोडेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
व्यापाऱ्यांची कोट्यवधीची रोकड घेऊन निघाले अन् :मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष तानाजीराव थोरात हे जळगावचे रहिवाशी असून ते जळगाव मधील स्कायकिंग कुरियर सर्व्हिसमध्ये नोकरी करतात. या कुरियर मार्फत जळगावहून मुंबईतील व्यापारांना व्हॅनमध्ये रोकड पोहोचवण्याचा व्यवसाय करतात. त्यातच जळगाव वरून कैलाश लोहार आणि सचिन सोडे हे दोघे चालक आणि कामगार रोकड पोचविण्याचे काम करत असतात. नेहमी प्रमाणे हे दोघे जळगाव वरून १५ मार्च रोजी मुंबईच्या दिशेने व्हॅनमध्ये व्यापाऱ्यांची कोट्यवधीची रोकड घेऊन निघाले होते.
रक्कम घेऊन नाशिकच्या दिशेने काढला पळ :ही व्हॅन इगतपुरीवरून १५ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई-नाशिक महार्गावरील शहापूर तालुक्यातील आठगाव हद्दीतील महामार्गावर आली. दरम्यान इनोव्हा कारमधून अज्ञात दरोडेखोर त्यांच्या मागावर असताना त्यांनी त्या ठिकाणी पोलीस पथक असल्याचं सांगून व्हॅनच्या चालकाला व्हॅन थांबून बाजूला घेण्यास सांगितले. तसेच व्हॅनमध्ये काय रोकड आहे का? असल्यास तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल. त्यामुळे तुमच्या व्हॅनची तपासणी करायची आहे, असं सांगून व्हॅनमधील नोटांच्या बंडल असलेल्या दोन पॅक गोण्यातील ५ कोटी ४० लाखांची रोकड बाहेर काढली. यानंतर दरोडेखोर ही रक्कम त्याच्या इनोव्हा कारमध्ये टाकून नाशिकच्या दिशेने पळून गेले.