मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळी काही तासावर येऊन ठेपली आहे. या सणासुदीच्या काळात विशेष म्हणजे दिवाळीत विविध प्रकारचे फराळ घरी बनवले जातात. गोडधोड बनवलं जातं. हे पदार्थ किंवा फराळ बनविण्यासाठी आवश्यक असणारे तेल, तूप, साखर मैदा आणि रवा आदी बाजारात खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसत आहे. मात्र, हे जिन्नस खरेदी करताना ग्राहकांनी सावधान राहावे. कारण दिवाळीच्या सणातच बनावट तूप बाजारात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्यामुळं याबाबत खुद्द अमूलनचं खबरदारीचा इशारा दिलाय.
बनावट तूप कसं ओळखाल? : भारतीय दूध ब्रँडमध्ये 'अमूल' हे एक प्रसिद्ध आणि विश्वासू दूध मानलं जातं. अमूलचे अनेक उत्पादन बाजारात विकली जातात. यामध्ये दूध, तूप, लोणी, दही आदी उत्पादनं विकली जातात. मात्र, सध्या अमूल कंपनीच्या नावानं बनावट तूप विकलं जात असल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं आहे. याबाबत अमूल कंपनीने एक जाहिरात जारी करून ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिलाय. काही एजंट अमूलचं लेबल चिकटवून अमूल कंपनीचं तूप आहे असं सांगून बनावट डिस्ट्रीब्यूट करत आहेत. हे बनावट तूप एक लिटरच्या पॅकेटमध्ये पॅक करून दिलं जातं आहे. परंतु कंपनीनं असं एक लिटरचं पॅकेट मागील 3 वर्षापासून उत्पादित केलं नसल्याचं कंपनीनं म्हटलंय.
तक्रारीसाठी 'या' नंबरवर संपर्क साधावा : दरम्यान, ग्राहकांनी कोणतेही प्रॉडक्ट विकत घेताना ते तपासून पाहावे. तसेच अमूलचं तूप सुद्धा विकत घेताना तपासून पाहावं. "बनावट अमूलच्या तुपापासून वाचण्यासाठी ड्युप्लिकेशन प्रूफ कार्टन पॅकची सुरुवात केलीय. हे पॅकेजिंग अमूलच्या आयएसओ प्रमाणित डेअरिंमध्ये तंत्रज्ञानाच्या साह्याने तयार केले आहे. या तंत्रामुळं तुपाची गुणवत्ता निश्चित होते. त्यामुळं ग्राहकांनी तूप खरेदी करण्याआधी एकदा हे पॅकेजिंग तपासून घ्यावं. तसेच कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास ग्राहकांनी तक्रारीसाठी 1800 258 3333 या नंबरवर संपर्क साधावा," असं अमूल कंपनीनं ग्राहकांना आवाहन केलंय.