पुणे Anil Deshmukh : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी केली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. राज्यात लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपलं मत व्यक्त केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांची आज बैठक बोलावली, यावेळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख या बैठकीला आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
विधानसभेनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार : यावेळी बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या आहेत. पुढील तीन महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्ष मिळून लढविणार असून राज्यात या निवडणुकीत 100 टक्के महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात आहे." तसंच पुढील तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे आणि आजच्या बैठकीत येणाऱ्या विधानसभा बाबत बैठक आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.