मुंबई Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसंच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू यांच्या शिष्टमंडळाचे गुरुवारी (26 सप्टेंबर) मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं.
राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका :केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे 27 ते 28 सप्टेंबर या दोन दिवसीय भेटी दरम्यान राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला होता आढावा : यापूर्वी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 12 आणि 13 सप्टेंबर रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि मुख्य जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता. यावेळी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची स्थिती, अद्ययावत मतदार यादी, मतदान साहित्याची स्थिती आणि जिल्हास्तरीय निवडणूक व्यवस्थापन, विशेषत: मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि सुरक्षा व्यवस्था याविषयी माहिती घेतली. याशिवाय मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय तयारीचा आढावाही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला होता.
हेही वाचा -
- आगामी विधानसभा निवडणूक 2024 फक्त देवेंद्र फडणवीस नव्हे, तर 'या' नेत्यांच्या नेतृत्वात लढवणार भाजपा - Assembly Election 2024
- निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून योजना आणि घोषणांचा पाऊस, केंद्र सरकारच्या योजनेचा महाराष्ट्रातच शुभारंभ का? - Vidhan Sabha Election 2024
- निवडणुकीपूर्वी महायुतीत जागांवरून रस्सीखेच, आठवलेंची 'इतक्या' जागांची मागणी - Ramdas Athawale