मुंबई Lok Sabha Election 2024 :देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव लोकसभा निवडणूक 2024 च्या रुपानं पार पडत आहे. देशात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्वांनी मतदान करावं, यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच "मतदार राजाला लोकशाहीनं जो मतदानाचा हक्क दिला, तो तुम्ही व्यवस्थितपणे योग्य उमेदवाराला मतदान करुन बजावावा," असं आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे.
मधाच्या बोटाला बळी पडू नका :निवडणूक आली की राजकीय पक्षाकडून मतदारांना विविध आमिषं दाखवली जातात. तुमच्या मतदारसंघातील शाळा, रस्ते, पाणी, वीज आदी कामं करू, अशी आश्वासनं राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून देऊन मतदान पदरात पाडून घेतात. याला 'मधाचे बोट चाटवणे' असं म्हणतात. "मुंबईत पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मतदान होणार आहे. परंतु आतापासूनच मतदारांनी सावध राहून योग्य उमेदवाराला मतदान करावं," असं निवडणूक आयोगानं आवाहन केलं आहे. मतदार राजानं 'मधाच्या बोटाला बळी पडू नयं," असंही आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे. "जे उमेदवार मतं मागण्यासाठी येतील, त्यांना तुम्ही काय काम करणार ?, कोणती विकासकामं करणार ?, किती वेळात काम करणार ?, आदी प्रश्न विचारा आणि योग्य उमेदवारालाच मतदान करा, 'मधाच्या बोटाला' बळी पडू नका," असा सल्ला देणारे बॅनर्स मुंबईत ठीक-ठिकाणी लावण्यात आले आहेत.
आमिषाला आणि भूलथापांना बळी पडू नका :लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पाच वर्षातून एकदा होते. मतदानाच्या दिवशी फिरायला न जाता आपणाला लोकशाहीनं जो मतदानाचा अधिकार आणि हक्क दिला आहे तो प्रत्येकानं प्रामाणिकपणे बजावला पाहिजे, असं वारंवार जाहिरातीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. आता मुंबईत मतदारांनी न चुकता मतदान करावं, यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून विविध ठिकाणी बॅनर आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. मुंबईत बस स्टॅन्डवर मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. बॅनर्सच्या माध्यमातून "मधाच्या बोटाला.. बळी पडू नका," असा सल्ला आणि आवाहन राज्य निवडणूक आयोगानं मतदारांना केलं आहे. "तुमचं मत अमूल्य आहे... पैसा अथवा तत्सम किरकोळ आमिषाला भुलून मतदान करू नका. निवडणुकीत दिलेले मत म्हणजे आपली इच्छा आकांक्षांचा आवाज आहे. हा आवाज दुर्बल होऊ देऊ नका, कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निष्पक्ष आणि निर्भीडपणे मत द्या. प्रलोभनमुक्त निवडणुकीचा निर्धार करू, उत्सव लोकशाहीचा साजरा करू" असा मजकूर बॅनरवर राज्य निवडणूक आयोगाकडून लिहिण्यात आला आहे.
मतदान वाढीसाठी विविध उपक्रम :मतदान वाढीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जाहिरातीच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात येत आहे. "आता प्रसिद्ध टीव्ही मालिका यातील कलाकारांच्या माध्यमातून देखील मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. याचबरोबर आयपीएलमधील 14 एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या सामन्यादरम्यान लोकांनी मतदान करावं यासाठी मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे," अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा :
- लोकसभा निवडणूक 2024 : मतदान जागृतीसाठी आता निवडणूक आयोग घेणार अंगणवाडी सेविकांचा आधार - Lok Sabha Election 2024
- Lok Sabha Elections : 12 राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त-निवडणूक आयोग
- निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; आयोगाच्या 'या' आदेशाला न्यायालयाची स्थगिती