मुंबई :विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ते अर्ज मागे घेण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. आजपासून खऱ्या अर्थानं प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. रविवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कुर्ला इथं पहिली सभा घेऊन प्रचाराला सुरुवात केली. या प्रचारात शिवसेना पक्षानं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिनेता गोविंदा, अभिनेता शरद पोंक्षेसह मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, गुलाबराव पाटील, नीलम गोऱ्हे आदींचा समावेश आहे. त्यामुळे आता हे स्टार प्रचारकांच्या तोफा विरोधकांवर धडाडणार आहेत.
आजपासून धडाडणार प्रचाराच्या तोफा : आजपासून खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होणार आहे. या प्रचारात विरोधक सत्ताधारी एकमेकांची ऊनीदुणी काढताना दिसणार आहेत. तर मागील एक दोन दिवसांपासून मुंबईत जे उमेदवार उभे आहेत, त्यांनी आपली प्रचाराची कार्यालय उघडली आहेत. रविवारी उबाठा माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश सावंत यांनी कार्यालयाचं खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते उद्घाटन केलं. तर हे एक दोन दिवसात अनेक उमेदवार आपल्या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. अशातच आज वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुपारी होणार आहे.