मुंबई :देशासाठी आदर्श व्यक्तिमत्व, परोपकारी उद्योगपती अशी ओळख असलेल्या रतन टाटा (Ratan Tata Passed Away) यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा, अशी मागणी विविध स्तरावरुन होत असतानाच आता राज्य मंत्रिमंडळात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय.
राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर : रतन टाटा यांना आज (10 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचं कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.
शोकप्रस्तावात नेमकं काय म्हटलंय? : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावात म्हटलंय की, "रतन टाटा यांच्या रुपानं आपण एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. देशाच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचं योगदान अपूर्व होतं. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळतानाउच्च प्रतीची नैतिक मूल्यं पाळली. कठोर कसोट्या पार पाडत टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपानं देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळलाय."
देशाच्या पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा सिंहाचा वाटा : "देशातील सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीनं त्यांनी काम पाहिलं .टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. मोटारीपासून मिठापर्यंत आणि कॉम्प्युटरपासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानानं जोडलं जातं. शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपलं अनन्यसाधारण योगदान दिलं. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणारा आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी पीएम रिलीफ फंडाला तत्काळ 1500 कोटी रुपये दिले. तसंच रुग्णांसाठी त्यांच्या बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिल्या. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.
हेही वाचा -
- रतन टाटांचं असंही श्वानप्रेम! चक्क लाडक्या श्वानासाठी रद्द केली प्रिन्स चार्ल्सची भेट; राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा
- "गुडबाय मिस्टर टी", रतन टाटांच्या निधनानंतर उद्योगपतींनी व्यक्त केला शोक
- दुर्मिळ रत्न हरपले...रतन टाटांच्या निधनानं संपूर्ण देशात शोककळा, राजकीय नेत्यांनी व्यक्त केलं दु:ख