मुंबई Sameer Wankhede : सीबीआयनंतर आता ईडीनं देखील मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीनं समीर वानखेडे आणि इतर दोन अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तपासात उघड झालं आहे की त्यांनी कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात आर्यन खानच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरुख खानकडून खंडणी मागितली होती. सूत्रांनुसार, ईडी लवकरच समीर वानखेडे, तत्कालीन अधीक्षक व्हीव्ही सिंग आणि गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना समन्स बजावणार आहे.
समीर वानखेडेंवरील आरोप काय : समीर वानखेडेवर ऑक्टोबर 2021 च्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुलगा आर्यन खानला अडकण्यापासून वाचवण्यासाठी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याशिवाय त्यांच्या विरोधात ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त संपत्ती मिळवल्याचा गुन्हाही प्रलंबित आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना समन्स बजावल्यानंतर समीर वानखेडे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ईडी ईएसआयआर रद्द करून कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.