नाशिक - दारूच्या नशेत मित्राचा मारहाणीत मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. दिंडोरी येथील घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश मिळालं. त्यानंतर दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील अकराळे फाटा येथे सापडलेल्या युवकाच्या संशयास्पद मृत्यूची उकल करण्यात दिंडोरी पोलिसांना यश आलं असून किरकोळ कारणावरून दारूच्या नशेत मित्रांनी त्याला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल. या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह अक्राळे फाट्याजवळ कचऱ्यात फेकल्याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी ओझर येथील दोन संशयित युवकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दारूच्या नशेत मित्राचा मारहाणीत मृत्यू, दोन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल, दिंडोरी तालुक्यातील घटना
दारूच्या नशेत दोन मित्रांनीच तिसऱ्या मित्राला मारहाण केली. दिंडोरी तालुक्यातील या घटनेत दीपक रमेश गांगोडे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Published : Nov 26, 2024, 2:19 PM IST
किरकोळ कारणावरून हाणामारी -दिंडोरी येथील शिवाजी नगर येथे राहत असलेला दीपक रमेश गांगोडे हा शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरातून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही म्हणून आई रंजना गांगोडे यांनी फोन करून विचारले असता, त्यानं दहा मिनिटात घरी येतो असं सांगत ओझर येथील मित्र मंगेश पावडे आणि अक्षय कुवर यांचे सोबत आहे असं सांगितलं. या मित्रांसोबत दारू पिऊन किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यावेळी दीपकच्या मानेवर लाथ मारल्यानं शरीरातील आतील भागात रक्तस्राव झाल्यानं तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला मोटार सायकलवर दिंडोरी नाशिक रोड लगत वनारवाडी शिवारातील राजयोग हॉटेलच्या जवळ कचऱ्यामध्ये टाकून दिलं. दोघे मोटारसायकल घेऊन निघून गेले.
दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल -बेवारस अवस्थेत असलेला मृतदेह पाहून स्थानिकांनी पोलिसांना संपर्क केला. पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोलीस उपनिरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी तपास करत मृताची ओळख पटवून तातडीनं तपास करून मंगेश पावडे आणि अक्षय कुवर या संशयितांना ताब्यात घेतलं. त्यानंतर मृताची आई रंजना रमेश गांगोडे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिंडोरी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.