मुंबई drunk driving on Holi : मुंबईत मोठ्या उत्साहात होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा झाला. या सणाला गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी कंबर कसली होती. रस्त्यांवर वाहनांची गर्दी नसली तरी वाहतूक पोलिसांनी चोखपणे कर्तव्य बजावत वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी 124 जणांवर दारू पिऊन वाहन चालविल्यानं कारवाई केली. ही माहिती वाहतूक विभागाचे अधिकारी रामकुमार यांनी दिली आहे.
धुळवडीच्यादिवशी दुचाकीस्वार तसेच कारचालक मद्यपान करून गाडी चालवतात. त्यामुळे अपघात होऊन नाहक बळी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतूक पोलीस मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलल्याचं दिसून आले. मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक पोलीस चौका-चौकावर वाहन चालकांवर कारवाई करताना दिसून आले.
4 हजार 593 दुचाकीस्वारांवर कारवाई -मद्यपान करून गाडी चालविण्याबरोबरच काही दुचाकीस्वार विना हेल्मेट प्रवास करताना आढळून आले. वाहतूक पोलिसांनी मुंबई सकाळी आठ वाजल्यापासून रात्री पाच वाजेपर्यंत एकूण 4 हजार 593 दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या एकूण 429 दुचाकीस्वारांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू राहिली. वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त कुंभारे यांनी केलं आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यानं आर्थिक दंड तरीही बेफिकीरी-सरकारी आकडेवारीनुसार 2019 मध्ये देशात 4,49,002 अपघात झाले आहेत. त्यामध्ये 1,51,113 जणांचा मृत्यू झाला. अनेक अपघात हे दारू पिऊन वाहन चालविण्यामुळे आणि वाहन चालकानं मद्यप्राशन करून नियमांचं भंग केल्यानं झाल्याचं समोर आलं आहे. वाहन अपघात टाळण्याकरिता चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करणे, वाहनाची गती नियंत्रित ठेवणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणं आणि विविध नियमांचं पालन करणं आवश्यक असते. नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलीस वाहनचालकांना मोठा आर्थिक दंड ठोठावतात. यापूर्वी आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम सरकारकडून वाढविण्यात आली असली तरी नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण कमी झालेले नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा-
- नाशिक : नवसाला पावणाऱ्या दाजीबा वीरांची मिरवणूक; पारंपरिक वेशभूषांनी चिमुकल्यांनी वेधलं लक्ष - Dajiba Vira Procession
- धुलीवंदनाचा अतिउत्साह नडला! समुद्रात पाच अल्पवयीन मुले बुडाली, एकाचा मृत्यू - Youth drowns in Mumbai sea