मुंबई -मुंबईच्या दीडशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष देणारे संग्रहालय म्हणजे डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय. आपण जेव्हा राणीच्या बागेत जातो तेव्हा हे संग्रहालय नजरेस पडले. पण मागील दीड वर्षे संग्रहालय डागडुजीसाठी बंद होतं. आता हे संग्रहालय पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं असून, संग्रहालय तब्बल दीडशे वर्षांहून अधिक जुनं आहे. तसेच याची बांधणी ब्रिटिशांनी केली होती. त्यानंतर साधारण 1975 मध्ये या संग्रहालयाला डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं नाव देण्यात आलंय. आज हे संग्रहालय डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्या नावानं ओळखलं जातंय. पण तुम्हाला माहिती आहे का? ब्रिटिशांनी या संग्रहालयाची उभारणी का केली? आणि डॉक्टर भाऊ दाजी लाड कोण होते? आणि त्यांचे मुंबईसाठी नेमकं योगदान काय? चला जाणून घेऊ यात.
मुंबईतील हे सर्वात जुने संग्रहालय : डॉक्टर भाऊ दाजी लाड या संग्रहालयाचा आपण इतिहास पाहिल्यास मुंबईतील हे सर्वात जुने संग्रहालय आहे. खरं तर हे संग्रहालय इंग्रजांनी बांधलं आणि त्या मागचं कारण ठरलं होतं इंग्लंडमध्ये भरवण्यात आलेलं एक प्रदर्शन. बृहन्मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 1851 मध्ये इंग्लंड येथे जागतिक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्या काळात मुंबईतील ब्रिटिश राजवटीने इकडेदेखील इंग्लंडप्रमाणे एखादं संग्रहालय असावं, अशी संकल्पना मांडली. त्यानंतर 1855 मध्ये राणी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय या नावानं याची स्थापना करण्यात आलीय. पुढे 1857 च्या काळात टाऊन बराक येथे सुरू करण्यात आलेलं संग्रहालय जनतेसाठी खुलं करण्यात आलंय.
गव्हर्नर सर हेनरी बार्टले फ्रेयर यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन :महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आपण सध्या भायखळ्यातील डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाची जी वास्तू बघतो, त्याची पायाभरणी 18 नोव्हेंबर 1962 मध्ये करण्यात आलीय. त्यावेळीचे गव्हर्नर सर हेनरी बार्टले फ्रेयर यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आलं होतं. वर्ष 1872 मध्ये या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय आणि सध्या आपण जी भायखळ्यातील वास्तू बघतो त्या संग्रहालयाचा प्रारंभ झालाय. पुढे साधारणत: 100 वर्ष हे संग्रहालय राणी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय या नावानेच ओळखलं जात होतं. 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर या संग्रहालयाचं नाव बदलण्याची मागणी होऊ लागली. त्यावेळी या संग्रहालयाच्या स्थापनेत सर्वात महत्त्वाचा वाटा उचलणारे डॉक्टर रामकृष्ण विठ्ठल लाड म्हणजेच डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचं नाव देण्याचा निर्णय झालाय. एक नोव्हेंबर 1975 रोजी या संग्रहालयाला डॉक्टर लाड यांचं नाव देण्यात आलंय.