महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्पक किल्ल्यांच्या निर्मितीसाठी चिमुकले रंगले मातीत; 240 विद्यार्थ्यांनी साकारले 63 किल्ले

अमरावतीत दिवाळीच्या पर्वावर मातीचे किल्ले बनविण्याची परंपरा कायम राहावी, यासाठी 'कल्पक किल्ले बनवा' स्पर्धा आयोजित केली जाते. गेल्या 30 वर्षांपासून ही स्पर्धा आयोजित केली जाते.

CHILDREN BUILT IMAGINATIVE CASTLES
चिमुकल्यांनी साकारले मातीचे किल्ले (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

अमरावती : दिवाळी हा आनंदाचा उत्सव आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला या उत्सवाची ओढ असते. लहान मुलांसाठी तर हा उत्सव आनंदाच्या पर्वणीपेक्षा कमी नाही. दिवाळी आली की पूर्वी घरोघरी मातीचा किल्ला उभारला जायचा. आता घरासमोर मातीच दिसत नसल्यानं मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा लोप होण्याच्या मार्गावर असताना, अमरावती शहरात अंबिका नगर परिसरातील महापालिका शाळा क्रमांक 16 च्या मैदानावर आयोजित 'कल्पक किल्ले बनवा' स्पर्धेत चिमुकल्यांनी साकारलेले किल्ले हे लक्षवेधी ठरलेत. श्री विठ्ठल आनंद सरस्वती फिरते वाचनालय, विदर्भ मलखांब असोसिएशन, दस्तूर नगर सेवा समिती, शंभू शौर्य मर्दानी आखाडा, महाराष्ट्र राज्य शिक्षक पालक संघ तसंच राजापेठ स्पोर्टिंग क्लब यांच्या वतीनं गेल्या 30 वर्षांपासून कल्पक किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित केली जाते.

चिमुकल्यांनी साकारली थक्क करणारी कलाकृती : अंबिका नगर येथील महापालिका शाळेच्या मैदानावर कोणी रायगड, कोणी तोरणा, काहींनी प्रतापगड, मुरुड जंजिरा, गाविलगड अशा किल्ल्यांसह विविध प्रकारच्या कल्पनेतील किल्ल्यांना चिमुकल्यांनी मातीत आकार दिला. किल्ल्यांवर भगव्या पताका, रात्रीच्या अंधारात किल्ल्यांमध्ये लागणारे दिवे यासह किल्ल्यांच्या आत वसलेलं गाव, तिथली संस्कृती असं सर्व चित्रण अनेक चिमुकल्यांनी मातीमध्ये साकारलं. चिमुकल्यांनी साकारलेली किल्ल्यांची कलाकृती ही थक्क करणारी. शहरातील एकूण 34 शाळांमधून 240 विद्यार्थ्यांच्या सहभागातून चिमुकल्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या कल्पनेतील 63 किल्ले साकारलेत.

कल्पक किल्ल्यांच्या निर्मितीसाठी चिमुकले रंगले मातीत (Source - ETV Bharat Reporter)

सेलफोन सोडून मुलांनी घातला मातीत हात : "दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यावर मुलं घरात आहेत आणि ते सेलफोनवर खेळत आहेत, असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी या कल्पक किल्ले स्पर्धेस्थळी नक्की भेट द्यावी. या ठिकाणी मुलं दोन दिवसांपासून सतत खेळण्यासाठी मातीचा वापर करत असून या मातीतून त्यांनी आपल्या कल्पकतेनं किल्ले साकारले," असे कौतुकोद्गार या स्पर्धेचे आयोजक सुनील पांडे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना काढले. "आम्ही हा उपक्रम गेल्या 30 वर्षांपासून राबवत आहोत. विविध प्रकारचे किल्ले या स्पर्धा स्थळी निर्माण करण्यात आलेत. आपण छानसा किल्ला निर्माण केला ही आठवण, हा अनुभव या ठिकाणी किल्ला निर्माण करणाऱ्या प्रत्येक चिमुकल्याला कायम राहील," असं देखील सुनील पांडे म्हणाले.

दिवाळीत किल्ला निर्मितीची अशी आहे प्रथा : "महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा इतिहास अतिशय जुना आणि महत्त्वाचा आहे. हे गड किल्ले पाहणं सर्वांनाच शक्य नव्हतं. मात्र, ज्यांनी हे गड किल्ले पाहिलेत त्यांनी या गड किल्ल्यांचं ज्याप्रमाणे वर्णन केलं, त्याप्रमाणे शाळेमध्ये चिमुकल्यांकडून गड किल्ल्यांचं चित्र काढलं जायचं. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विरंगुळा म्हणून घरासमोर दगड, माती, शेण याद्वारे चिमुकले त्यांनी ऐकलेले, पुस्तकात पाहिलेले गड किल्ले आपल्या कल्पनेनं तयार करायला लागले आणि यातूनच दिवाळीच्या पर्वावर किल्ले बांधण्याची प्रथा सुरू झाली. अशा स्वरूपाच्या किल्ले निर्मितीतून चिमुकल्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोण वाढतो." अशी माहिती देखील सुनील पांडे यांनी यावेळी बोलताना दिली.

हेही वाचा

  1. विधानसभा निवडणूक आणि दिवाळीमुळं फटाक्यांच्या किंमतीत 10 टक्के वाढ
  2. दिवाळी होणार गोड; महागाईच्या काळात मिळणार स्वस्तात लाडू, चिवडा
  3. यंदाची दिवाळी साजरी करण्याआधी वाचा नियम, 'या' वेळेत फोडा फटाके अन्यथा...; मार्गदर्शक सूचना जारी

ABOUT THE AUTHOR

...view details