मुंबई :Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून विशेषतः उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुरू असलेली धुसपूस आता चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात लोकसभेच्या पाच जागांबाबत समझोता होत नसल्याने या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत केली जावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. यावरून आता ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केलीय. जर अशा मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर त्याचा परिणाम इतर लोकसभा मतदारसंघांमध्ये मग तो देशातील कुठल्याही मतदारसंघांमध्ये होऊ शकतो. अशी शक्यताही ठाकरे गटाने वर्तवली आहे. ठाकरे गट मैत्रीपूर्ण लढतीसाठी कदापि तयार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, या मैत्रीपूर्ण लढतीवर "फ्रेंडली फाइट्स" असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
समझोता होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत : भाजपाला काटे की टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) सर्व घटक पक्ष एकत्र आले आहेत. परंतु, जागावाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू आहे. सर्वात अगोदर काँग्रेसनं काही जागांवर उमेदवारांची नावं घोषीत केल्यानंतर त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या 18 उमेदवारांची यादी घोषीत केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. यावरून जागावाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
कोल्हापूरची आमची हक्काची जागा सोडली : सांगलीमध्ये ठाकरे गटाने त्यांचा उमेदवार घोषीत केल्याने काँग्रेसकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. यावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये बरीच शाब्दिक चकमक झाली. जर सांगलीची जागा आम्ही घेतली तर कोल्हापूरची आमची हक्काची जागा आम्ही काँग्रेसला सोडली आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. (Sanjay Raut criticized the Congress) त्यांनीसुद्धा आम्हाला विचारात न घेता परस्पर ती जागा घोषीत केली, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबईची जागाही काँग्रेसला हवी होती ती शिवसेनेनं घेतली त्यावरूनही बरेच वाद-विवाद झाले.
ठाकरे गटात नाराजी : आता काँग्रेसला सांगली, भिवंडी, ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई या जागांवर सुद्धा उमेदवार उभे करायचे आहेत असं समजतय. यासाठी जर समझोत्याने या जागांवरचा तिढा सुटत नसेल तर या जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते आग्रही आहेत. मात्र, यावरून ठाकरे गटात नाराजी आहे.
काँग्रेसने अधिकृत प्रस्ताव द्यावा : मैत्रीपूर्ण लढतीच्या विषयावर बोलताना, संजय राऊत म्हणाले, मैत्रीपूर्ण लढत हा पर्याय कदापी होऊ शकत नाही. मैत्रीपूर्ण लढतीमुळे भाजपाचाच फायदा होणार आहे. काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव हा अधिकृतपणे द्यायला हवा. त्यांच्या अधिकृत प्रस्तावानंतर आम्ही त्याबाबत विचार करू. तसंच जर का मैत्रीपूर्ण लढती करायच्याच असतील तर त्या पाचच मतदार संघात का? संपूर्ण 48 मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढती घ्या. काँग्रेस पक्ष हा समजूतदार असून मैत्रीपूर्ण लढतीचा काय परिणाम होतो, हे त्यांनी अनुभवलं आहे, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
चार महिन्यापासून ते हेच करत आले : काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील मैत्रीपूर्ण लढतीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बरोबर आहे, महाविकास आघाडी असू दे किंवा इंडिया आघाडी ही त्यांची फ्रेंडली फाईटच आहे. मागील चार महिन्यापासून ते हेच करत आले आहेत. फ्रेंड म्हणून एकत्र बसतात आणि नंतर स्वतःच फाईट करतात, म्हणून ही फ्रेंडली फाईटच आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाने जागा वाटपाबाबत आतापर्यंत ज्या पद्धतीने घोषणा केल्या आहेत आणि त्यावरून जे वाद झाले आहेत. त्याला अनुसरून देवेंद्र फडणवीस यांनी हा खोचक टोला लगावला आहे.