पुणेDigvijay Yoddha Pagadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर असून पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते आज सभा घेणार आहेत. पुण्यातील रेस कोर्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. जवळपास एक लाखाहून अधिक लोक या सभेला येणार आहेत. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून "दिग्विजय योद्धा पगडी" बनविण्यात आली आहे. ही पगडी आज (29 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिधान करण्यात येणार आहे.
'ही' आहेत पगडीची वैशिष्ट्ये :याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्यासाठी पगडी बनवण्यात आली होती. आज जी पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिधान करण्यात येणार आहे ती पगडी दिग्विजय योद्धा पगडी असून लाल रंग असलेली पारंपरिक पुरातन पद्धतीप्रमाणे हाताने बांधलेली ही विशेष पगडी आहे. ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणारी, मोत्यांच्या तुऱ्यासह डोलवणारी, शुभचिन्हांनी नटवलेली, पंचधातूंनी सजवलेली, साक्षात तुळजाभवानी मस्तकी धारण करणारी, उन्हाळ्यातही सुसह्य व्हावी अशी खास बांधणी असणारी अप्रतिम नाविन्यपूर्ण ही पगडी असल्याचं यावेळी गिरीश मुरुडकर यांनी सांगितलं.