देवेंद्र फडणवीस यांनी इलोक्टोरल बाँड्सवर भाष्य केलं मुंबई Devendra Fadnavis On Rahul Gandhi : निवडणूक आयोगानं आज (16 मार्च) लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. यापूर्वी राज्यात महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेतले. या निर्णयानंतर पत्रकार परिषदेला सामोरं जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या देशात गाजत असलेल्या इलोक्टोरल बाँडवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपावर केलेल्या आरोपाला सडेतोड उत्तर दिलं.
राहुल गांधी काँग्रेसला भेटलेले बाँडचे पैसे परत करणार का? :यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीसम्हणाले आहेत की, "काँग्रेस भाजपावर इलोक्टोरल बाँड प्रकरणी विविध आरोप करत आहे. परंतु, इलोक्टोरल बाँडचे 30 टक्के पैसे भाजपाला आणि 70 टक्के पैसे इतर पक्षांना भेटलेत. त्यामध्ये काँग्रेसचा देखील समावेश आहे. आता राहुल गांधी काँग्रेसला भेटलेले पैसे परत करणार का?", असा खोचक सवाल त्यांनी केला. तसंच आम्हाला 30 टक्के पैसे भेटले कारण देशात आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. देशात आमचे 303 खासदार आणि 11 कोटी सदस्य आहेत. बाकी सर्वांना 70 टक्के पैसे भेटले, मग हे कोणाला धमकावून भेटले आहेत? वास्तविक हा सुप्रीम कोर्टाचा विषय आहे, असंही ते म्हणाले.
...त्यामुळं राहुल गांधींची तडफड : पुढं ते म्हणाले की, "ज्या कंपन्यांनी इलोक्टोरल बाँडला पैसे दिले त्यांना बॅलन्स शीट मध्ये याची नोंद करावी लागते. जे पैसे राजकीय पक्षांना भेटले त्यांनाही बॅलन्स शीट दाखवावी लागते आणि ती इलेक्शन कमिशनकडं सादर करावी लागते. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत अतिशय सुंदर सांगितलं आहे की, काँग्रेसमध्ये ही पद्धत होती. समजा 1100 रुपये भेटले तर 100 रुपये पक्षाला द्यायचे आणि हजार रुपये खिशात टाकायचे. कारण, तेव्हा इलोक्टोरल बाँडचा विषय नव्हता. त्यामुळंच आता काळ्या पैशांचा स्त्रोत बंद झाल्यामुळं, ही राहुल गांधी यांची तडफड आहे", असा आरोप देवेंद्र फडवणीस यांनी केला.
जागा वाटपाचा 80 टक्के पेपर सोडवला गेलाय : लोकसभेसाठी महायुतीच्या जागा वाटपाच्या तिढ्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जागावाटपा संदर्भात 80 टक्के पेपर सोडवला आहे. 20 टक्के प्रश्न अद्याप बाकी असून ते ही लवकर सोडवले जातील. आम्ही सन्मानजनक एकत्रितपणे निवडणूक लढवत आहोत. जे पहिल्या दिवसापासून पेपर सोडवायला बसले आहेत. त्या महाविकास आघाडीचा अजून पेपर सुटत नाही. पण आम्ही 80 टक्के पेपर सोडवलाय. अजित पवारांनी त्यांच्या जागा कधी घोषित करायच्या आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या जागा कधी घोषित करायच्या, हा त्यांचा अधिकार आहे", असंही यावेळी फडणवीसांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -
- Rahul Gandhi : इलोक्टोरल बाँड हे पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट- राहुल गांधी
- Electoral Bonds : इलेक्टोरल बॉंड्सचा डाटा निवडणूक आयोगानं देऊनही सर्वोच्च न्यायालयानं एसबीआयला फटकारलं
- Electoral Bond Data : 'लॉटरी किंग' सँटियागो मार्टिन यांनी निवडणूक रोख्यात दिल्या सर्वाधिक देणग्या; भाजपाला मिळाल्या 'इतक्या' देणग्या