पिंपरी- चिंचवड (पुणे) : चिखली येथे गुरुवारी नवीन पोलीस आयुक्तालय भूमिपूजन समारंभात अजित पवार यांनी भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच खडसावलं. काय झालं नेमकं? वाचा...
माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं? : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचं विधान महेश लांडगे यांनी केल्यानंतर अजित पवारांनी तोच धागा धरून, महेश लांडगे यांना "माझं नाव घ्यायला का वाईट वाटलं? हे मला माहित नाही. मात्र ज्यानी चांगलं काम केलं आहे, त्याला चांगलं म्हणायला शिका" असं म्हणत आमदार महेश लांडगे यांना टोला लगावला. पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन चिखली येथील प्रस्तावित जागेत करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहराज्य मंत्री योगेश कदम तसंच महायुतीचे आमदार उपस्थित होते.
...यामुळं वादाची ठिणगी : आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवनेरी जिल्हा तयार करण्याची जाहीर मागणी केली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री पवारांनी जिल्हा विभाजनाला स्पष्ट नकार दिला. पोलीस आयुक्तालय भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आमदार महेश लांडगे यांनी शहरभर ‘ब्रँडिंग’ केलं आणि भाजपानं श्रेय घेतलं. यावरुन वादाची ठिणगी पडली. महेश लांडगे यांनी शहरात भाजपाची जाहीरातबाजी केली. होर्डिंग आणि जाहिराती प्रसिद्ध केल्या. या जाहिरातींमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींचे फोटो झळकले. महायुतीचे सरकार असताना आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो जाहिरातींमध्ये दिसला नाही. ही बाब अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळं सकाळपासूनच अजितदादांचा पारा चढला होता, असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलं.