कोल्हापूरDog Bruno Passed Away :काँग्रेसचे निष्ठावंत आमदार अशी ओळख असलेले कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांचं गेल्या बुधवारी पहाटे निधन झालं. यामुळे अवघा जिल्हा शोकसागरात बुडाला होता. अनेक मोठ्या नेत्यांनी आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली होती. आता त्यांच्या मृत्यूला सात दिवस उलटत नाहीत तोपर्यंत आमदार पाटील यांचा लाडका ब्रुनो या श्वानानेही जगाचा निरोप घेतला. गेल्या नऊ वर्षांपासून घरात सदस्य बनलेला श्वान लाडक्या पालकाचा विरह सहन करू शकला नाही. मुक्या प्राण्याला जीव लावल्यास प्राणीही माणसापेक्षा अधिक भावनिक असतात हेच यामुळे सिद्ध झालं आहे.
मालकानंतर श्वानाचाही मृत्यू :दिवंगत आमदार पी एन पाटील हे रविवारी 12 मे रोजी घरात बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला जबर इजा झाली होती. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना गेल्या बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर राज्यभर आमदार पाटील यांच्या निधनाने हळहळ व्यक्त झाली. करवीर तालुक्यातील आमदार पाटील यांचं जन्मगाव असलेल्या सडोली खालसा या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या राजारामपुरी येथील निवासस्थानी गेली नऊ वर्ष त्यांच्यासोबत असलेला त्यांचा श्वान ब्रूनो हा घरातील सर्व सदस्यांचा लाडका होता; मात्र आमदार पाटील यांच्या निधनानंतर या मुक्या प्राण्यांनं अन्नपाणी सोडलं होतं. यानंतर आज या ब्रुनोनं जीव सोडला. गेली नऊ वर्ष आपल्या मालकाशी प्रामाणिक राहिलेल्या या श्वानाच्या एक्झिट नंतर मालकावरील या मुक्या प्राण्याचं प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.