मुंबई Kirit Somaiya Letter Bomb : भाजपा नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या व्यवस्थापन समितीची घोषणा केली. ही घोषणा करुन 12 तास होत नाहीत, तोच त्यामध्ये किरीट सोमय्या यांनी खो घातला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा या समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या समितीत निवडणूक संपर्कप्रमुख म्हणून माजी खासदार, किरीट सोमय्या यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु या नियुक्तीबद्दल किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली. हे पद न स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तशा पद्धतीचं पत्र त्यांनी राज्य नेतृत्वाला लिहिलं आहे.

किरीट सोमय्या यांना परिषद सोडण्याचे निर्देश : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष राहण्यासाठी आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी भाजपा तयारीला लागला आहे. यासाठी निवडणूक व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. या समितीत भाजपा नेते किरीट सोमय्या यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी "निवडणूक आयोग संपर्क प्रमुख" म्हणून नेमणूक केली गेली. पण या नेमणुकीबद्दल किरीट सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपाचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी त्यांना न विचारता त्यांची नियुक्ती जाहीर केल्यानं किरीट सोमय्या यांनी हे पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सोमय्या यांनी याकरता पक्षाच्या राज्य नेतृत्वाला खरमरीत पत्र लिहिलं असून या पत्रात त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. पत्रात किरीट सोमय्या यांनी 18 फेब्रुवारी 2019 रोजी ब्ल्यू सी हॉटेल, वरळी इथं झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतील प्रसंगाचा उल्लेख केला आहे, जिथं उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपाच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांना परिषद सोडण्याचे निर्देश दिले. तेव्हापासून किरीट सोमय्या यांनी भाजपामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं ठरवलं.

सामान्य सदस्य म्हणून भाजपामध्ये निष्ठेनं कार्य केलं : किरीट सोमय्या यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, "गेल्या साडेपाच वर्षांत त्यांनी एक सामान्य सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षात निष्ठेनं कार्य केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उघडकीस आणली असून, त्या काळात त्यांच्यावर तीन वेळा जीवघेणे हल्ले देखील झाले. तरीही त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली आणि पक्षाशी एकनिष्ठा राखली. यासोबतच किरीट सोमय्या यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती केली आहे की, अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक पुन्हा त्यांना देऊ नये. निवडणूक आयोग संपर्क प्रमुख या पदासाठी इतर दुसऱ्या कोणाची नियुक्ती करावी."
किरीट सोमय्या यांच्या लेटर बॉम्बमुळे खळबळ : किरीट सोमय्या यांच्या या आक्रमक निर्णयामुळे भाजपामध्ये काहीशी तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले की, ते पक्षाच्या कार्यात योगदान देत राहतील, पण निवडणूक आयोग संपर्क प्रमुख हे पद ते स्वीकारणार नाहीत. सोमय्या यांच्या या लेटर बॉम्बमुळे भाजपात खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी स्पष्टपणे आक्रमक भूमिका घेतल्यामुळे भाजपाचे नेते त्यांची कशा पद्धतीनं मनधरणी करतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
- उद्धव ठाकरेंचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याची इच्छा नव्हती, मात्र पक्षादेश म्हणून घोटाळे बाहेर काढले; किरीट सोमैयांचा मोठा गौप्यस्फोट - Kirit Somaiya
- "केजरीवाल जेलमध्ये गेले आणि संजय राऊत...", केजरीवालांचं उदाहरण देत किरीट सोमैयांचा राऊतांवर निशाणा - Kirit Somaiya News
- Anil Parab On Kirit Somaiya : किरीट सोमैया यांच्या विरोधातील दावा तीव्र करणार; अनिल परब यांची प्रतिक्रिया