नवी मुंबई : रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गेली ३० वर्षांहून अधिक काळ ते काँग्रेसमध्ये विविध पदावर कार्यरत होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, "इंडिया आघाडी ही स्वार्थासाठी, खुर्चीसाठी एकत्र आलेली आघाडी आहे, ही आघाडी मोदी द्वेषानं पछाडलेली आहे."
'इंडिया' आघाडी ही स्वार्थासाठी, खुर्चीसाठी एकत्र आलेली आघाडी : "शिवसेना ही लोकांचं काम करणारी, लोकांचे प्रश्न सोडवणारी संघटना आहे. शिवसेनेवर विश्वास असल्यामुळं इतर पक्षांचे पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत. शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन पक्षप्रवेश करत आहेत," अस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दिल्लीत भाजपाचा झालेला विजय यावर प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्र्यांनी 'इंडिया' आघाडीवर ताशेरे ओढत जोरदार टीका केली. यावेळी ते म्हणाले की, "इंडिया आघाडी ही स्वार्थासाठी, खुर्चीसाठी एकत्र आलेली आघाडी आहे. ही आघाडी मोदी द्वेषानं पछाडलेली आहे. काँग्रेसची प्रगती शून्याकडं जात आहे, काँग्रेसचा भोपळा फुटलेला आहे."
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter) लोकांचे प्रश्न सोडवले जातील : "नवी मुंबईतील लोकांना आपल्या अडचणी प्रश्न मांडण्यासाठी खासदार कार्यालयाच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण झालं. बाळासाहेब ठाकरेंनी जसं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध ठिकाणी विविध शाखांचं जाळं वाढवलं होतं, त्याचप्रमाणे 'खासदार' कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न नक्कीच सोडवण्यात येतील," असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नवी मुंबईत काँग्रेसला खिंडार : माजी उप महापौर मंदाकिनी म्हात्रे, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, अनिकेत म्हात्रे, रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नवी मुंबईत खासदारांच्या कार्यालयाचं लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. रमाकांत म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशानं नवी मुंबईत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पक्ष सोडण्यापूर्वी रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसच्या अनेक गोष्टींवर नाराजी देखील व्यक्त केली होती.
हेही वाचा :
- पुण्यातील कोंढवा परिसरातील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू तर एक जखमी
- पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा...
- श्रद्धा वालकरच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास; शेवटची इच्छाही राहिली अधुरीच