पालघर Palghar News : मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेल्या आणि नंतर पाकिस्तानच्या तुरुंगात (Pakistan Jail) असलेल्या डहाणू तालुक्यातील एका खलाशाचा मृत्यू झालाय. दीड महिना झाला तरी त्यांचा मृतदेह अजूनही कुटुंबियांना मिळालेला नाही. त्यामुळं कुटुंबियांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पाकिस्तानात अटक : गेल्या दोन वर्षांपूर्वी मासेमारी करताना कोल हे भारताची हद्द ओलांडून पाकिस्तानच्या समुद्री हद्दीत गेले होते. पाकिस्तानात त्यांना अटक करण्यात आली होती. खलाशांच्या अदलाबदलीतही त्यांची सुटका झाली नाही. त्यामुळं ते पाकिस्तानात राहिले होते. आता त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. विनोदच्या पश्चात त्यांची पत्नी सखू तसेच भारती (विवाहित), मालती, वृतिका, कल्पित या मुली आणि चिराग आणि पिंटू हे मुले आहेत.
सात खलाशी डहाणू तालुक्यातील : विनोद आणि त्यांचे सहकारी २५ सप्टेंबर २०२२ रोजी गुजरातच्या ओखा बंदरातील मत्स्यगंधा ही मासेमारी बोट घेऊन मासेमारीसाठी अरबी समुद्रात गेले होते. चुकून त्यांनी भारताची हद्द ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केला होता. पाकिस्तानच्या तटरक्षक दलानं त्यांना २७ सप्टेंबर २०२२ रोजी अटक केली. त्यात नऊ खलाशी होते. त्यातील सात खलाशी हे डहाणू तालुक्यातील आदिवासी होते.
‘हे’ खलाशी पाकिस्तानी तुरुंगात :नवश्या महाद्या भिमरा, सरिता सोन्या उंबरसाडा, कृष्णा रामज बुजड, विजय मोहन नगवासी, विनोद लक्ष्मण कोल, जयराम जान्या सालकर, उधऱ्या रमण पाडवी यांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी विनोद यांचा कराची येथील तुरुंगात मृत्यू झाला. त्यांना आठ मार्च रोजी स्नानगृहात अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर उपचार सुरू असताना १८ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
तीस तारखेला मृतदेह भारतात : विनोद यांच्या मृत्यूची बातमी कळताचं त्यांचे कुटुंबीय मानसिक तणावात होते. विनोद यांच्या मागे त्यांची पत्नी सखू तसेच मालती, वृत्तिका, कल्पित या मुली आणि चिराग आणि पिंटू ही दोन मुले आहेत. "आम्हाला कोणतीही मदत नको, फक्त मृतदेह ताब्यात द्या," अशी मागणी विनोद यांच्या कुटुंबियांनी केली. ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी याबाबत चौकशी करून, विनोद यांचा मृतदेह तीस एप्रिल किंवा एक मे रोजी भारतात येणार असल्याचं सांगितलं.