मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकमधून आलेल्या एका प्रवाशाकडून एक दोन नाही तर तब्बल 1.45 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थात 1.45 कोटी रुपयांचा गांजा असल्याची माहिती समोर आली आहे. तर, या प्रवाशानं मोठ्या चतुराईनं कोणालाही संशय येऊ नये, याकरिता व्हॅक्यूम-शीलबंद पॅकेटमध्ये गांजा लपवला होता, अशी माहिती कस्टम विभागानं दिली आहे.
कस्टम विभागाची कारवाई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मागील महिन्यात कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आता शनिवारी (19 ऑक्टोबर) बँकॉकमधून आलेल्या एका प्रवाशाकडून 1.45 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. 1962 सीमाशुल्क कायदा आणि 1985 एनडीपीएसनुसार अमली पदार्थ कायद्याअंतर्गत आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास कस्टम विभागाचे अधिकारी करत आहेत. तर अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी कस्टम विभागानं मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे.