अमरावती Kukuru tourist spot :मध्य प्रदेशील सातपुडा पर्वत रांगेतील वन विभागाच्या अंतर्गत येणारं कुकरू हे पर्यटन केंद्र थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळा तसंच हिवाळ्यात धुक्यात बुडालेलं हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करतंय. मध्य प्रदेशातील या पर्यटन केंद्राला सर्वाधिक पसंती महाराष्ट्रात पर्यटकांनी दिलीय. विशेष म्हणजे एक दिवसाच्या सहलीसाठीदेखील हे ठिकाण पर्यटकांसाठी चांगला पर्याय ठरत आहे.
काय आहे कुकरूचं वैशिष्ट्य : मेळघाटातील सर्व महत्त्वाची ठिकाणी ब्रिटिशांनी विश्रामगृहे बांधली. ती ठिकाणे आज पर्यटनानं समृद्ध आहेत. अमरावती जिल्ह्यातील थंड ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा ते चुर्णी या मार्गावर समुद्रसपाटीपासून 3667 फूट उंचीवर असलेल्या कुकरू गावाजवळ 1906 मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृह बांधलं होतं. या विश्रामगृहाच्या तिन्ही बाजूंना खोल दऱ्या आहेत. पावसाळ्यात तसंच हिवाळ्यात या खोल दऱ्यांमध्ये धुकं निर्माण झाल्यासारखं वाटतं. खोल दरीतून वर येणारं धुक्यामुळं कुकरूला अनोखं रुप येतं.
पर्यटन केंद्रातील सुविधा :खरं तर, कुकरू पर्यटन केंद्र हे मानसिक आणि बौद्धिक शांततेसाठी एक नैसर्गिक औषधं आहे. मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं ब्रिटीशकालीन सध्याच्या विश्रामगृहांसह पर्यटकांसाठी नवीन खास दालन तयार करण्यात आलं आहे. आठ सार्वजनिक दालनांसाठी पर्यटकांना 450 रुपये प्रति व्यक्ती भाडं द्यावं लागतं. खासगी निवासाची व्यवस्थाही 1750 ते 2340 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ज्यांना जंगलात तंबूत राहण्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी येथंही व्ययवस्था करण्यात आली आहे. 300 ते 1000 रुपयांपर्यंत तुम्हा तंबूत राहण्याची पैसे मोजावे लागतील. या पर्यटन केंद्राजवळील जंगलातील महत्त्वाची ठिकाणं पाहण्यासाठी जंगल सफारीची व्यवस्थाही उपलब्ध आहे. मध्य प्रदेश सरकारनं जेवणाची उत्तम व्यवस्था केल्यामुळं पर्यटकांना सकाळी घरून जेवण आणण्याची गरज नाही.