मुंबईLok Sabha Election 2024 : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. कारण एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदार-खासदारांना पुन्हा निवडून आणण्याचं मोठं आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. दुसरीकडं लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत भाजपाकडून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. भाजपाकडून शिंदे गटाकडं असलेल्या जागांबाबत दबाव असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं शिंदे गटात अंतर्गत असंतोष असून, ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते बंडाच्या तयारीत आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर दुहेरी संकट उभं आहे. आपल्या खासदारांची तिकिटं वाचवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागणार आहे. तसंच शिवसेना भाजपाच्या हातातील बाहुली नसल्याचा स्वाभिमानी बाणा शिंदेंना कायम ठेवायचाय. ठाकरेंविरुद्धचं बंड जितकं आव्हानात्मक होतं, तितकाच आव्हानात्मक प्रश्न शिवसेना तसंच भाजपा यांच्यात जागावाटपा आहे. कारण या वाटाघाटीत यश आलं तरच सोबत आलेले आमदार-खासदार यांना लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत संधी देता येणार आहे. अन्यथा आमदार-खासदार वेगळा निर्णय घेऊ शकतात.
शिवसेनेच्या जागेवर भाजपाचा दावा : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. त्यातील 18 जागांवर शिवसेनेचा विजय झाला होता. दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपासोबत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांची शिवसेना बंडखोरीनंतर प्रथमच लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहे. महायुतीतील जागावाटपाचा वाद अद्याप सुटलेला नाही. सुरुवातीला भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना भाजपा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर जागावाटपाच्या वेळी भाजपानं अनेक जागांवर दावा केलाय. शिवसेनेनं हिंगोली तसंच हातकणंगले जागेसाठी उमेदवार जाहीर केली आहे. मात्र, या जागांसाठी उमेदवार बदलण्याची शक्यता आहे, असे संकेत शिंदे गटाचे (शिवसेना) आमदार संजय शिरसाठ यांनी दिले आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त केल्यानं उमेदवार बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगोलीच्या जागेसाठी दुसरा उमेदवार हवा असल्याचं भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितलंय. शिवसेनेचे सध्या नाशिक, कल्याण, ठाण्यात खासदार आहेत. मात्र, या जागांवरही भाजपाची नजर आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी, असा देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह आहे. कल्याण तसंच ठाण्यातही भाजपा आपल्या उमेदवाराची चाचपणी करत आहे. त्यामुळं शिवसेनेसमोर या जागा राखण्याचं मोठं आव्हान आहे.
शिवसेनेत असंतोष :लोकसभेच्या जागा वाटपाबाबत सुरू असलेल्या वाटाघाटींवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या हक्काच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी शिवसेनेची भूमिका आहे. दुसरीकडं हिंगोलीतून हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तेथून उमेदवार बदलण्याची शक्यता असल्यानं हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय. हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आलेली नाही. मात्र, त्यांनी प्रचार सुरू केला आहे. तिथं विद्यमान अन्न नागरी पुरवाठा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळं हेमंत गोडसे बंड करू शकतात, असंही बोललं जात आहे. हातकणंगले जागेसाठी धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली असली, तरी ही जागा बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं माने यांनी स्पष्ट केलं आहे. एकंदरीत जागावाटपावरून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. याच दबावामुळं शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूर वाढत चालला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.