ठाणे : सोमवारी पहाटे ठाण्याच्या नितीन कंपनी जंक्शनवर मर्सिडीजनं केलेल्या "हिट अॅन्ड रन" प्रकरणातील मर्सिडीज चालकाची ओळख पटली. अभिजित नायर असं त्याचं नाव असून ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेनं त्याला मंगळवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला तपासासाठी नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली.
ठाण्यात हिट अॅन्ड रन प्रकरणात तरुणाचा बळी :सोमवारी पहाटे 1.50 वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या नितीन कंपनी जंक्शनवर मर्सिडीज कार भरधाव वेगानं नाशिक-मुंबई महामार्गावरुन मुंबईच्या दिशेनं जात होती. यावेळी नितीन कंपनी जंक्शनवर दर्शन शशीधर हेगडे (21 रा. संत ज्ञानेश्वर नगर, स्वीकृपा सदन चाळ, रूम नं 3 ) याला जोरदार धडक देत कारचालकानं पलायन केलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दर्शन याला नितीन चौकातील रिक्षाचालक मनीष यादव यानं रिक्षातून कौशल्य रुग्णालयात नेलं. उपचारादरम्यान दर्शनचा मृत्यू झाला. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या माध्यमातून मर्सिडीज कारच्या क्रमांकावरून मर्सिडीज मालक अभिजित नायर हा असून तो मुलुंडचा असल्याचं समोर आलं. तर मर्सिडीज कार ही मुलुंडच्या पालिका वाहन तळात आढळली. दरम्यान नौपाडा पोलिसांनी वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली. तर फरार अभिजित नायर याचा शोध सुरु केला. नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी अभिजीतच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावलं तर संध्याकाळी कुटुंबीयांचीही चौकशी केली. त्या दरम्यान ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेनं मर्सिडीज चालक अभिजित नायर याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेलं. त्यानंतर नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.