मुंबई : भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघांपैकी एक आहे. यावर्षी भारतीय क्रिकेट संघानं टी-20 विश्वचषकही जिंकला. क्रिकेटविश्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक क्रिकेटपटू चांगली कामगिरी करत आहेत. पण या यशस्वी क्रिकेटपटूंना घडवण्यात प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. दरम्यान, महान प्रशिक्षक आणि मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू तथा भारतरत्न सचिन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं शिवाजी पार्क येथे 3 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. या लोकार्पणाला त्यांचे शिष्य आणि महत्त्वाचे राजकीय नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी दिली. आज त्यांनी मुंबईतील पार्क क्लब येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
शिवाजी पार्क सरांची कर्मभूमी : प्रवीण आमरे म्हणाले की, "रमाकांत आचरेकर यांनी आमच्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना घडवलं. शिवाजी पार्क ही त्यांची कर्मभूमी आहे, त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक उभारले जात आहे, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या स्मारकात त्यांच्या अनेक आठवणी असणार आहेत. यासह क्रिकेट साहित्य असणार म्हणजे बॉल, बॅट, पॅड, स्टंप तसंच आचरेकर सर यांच्या अनेक आठवणी असणार आहेत. विशेष म्हणजे आचरेकर सरांची आवडती टोपी ही सुद्धा या स्मारकात पाहायला मिळणार. त्यांनी आम्हाला केवळ एक क्रिकेटपटू म्हणून नाही तर, प्रशिक्षक म्हणूनही आम्हाला घडवलं आणि तीच शिकवण आम्ही पुढे नेत आहोत. सर्वांच्या सहकार्यानं आणि पाठिंबानं हे स्मारक होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि ज्यांनी पाठिंबा दिला, त्या सर्वांना धन्यवाद देतो. 3 डिसेंबर रोजी या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. त्यावेळी अनेक महत्त्वाचे नेते आणि सर्व त्यांचे शिष्य उपस्थित राहणार आहेत."