हैदराबाद Cows Breeds in Maharashtra : दुधाची वाढती गरज लक्षात घेता सर्वच पशुधनांमध्ये संकरीकरण झालंय. अनेक पशुधनाच्या देशी जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात गायीच्या सात जाती आढळून येतात. काही दिवसांपूर्वीच 'भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो'नं सातव्या गायीच्या जातीला मंजुरी दिली होती. त्यामुळं महाराष्ट्रात नोंदणीकृत म्हशींची संख्या चार आहे, तर गायींची संख्या सात आहे.
गोपालनातून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार; राज्यात आढळतात सात प्रजातींच्या गायी - Cows Breeds in Maharashtra
Cows Breeds in Maharashtra : शेती तोट्यात असल्याचं म्हटलं जातं. मात्र, गोपालनातूनही चांगली आर्थिक उलाढाल होत असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिले असतील. अनेक शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून गो पालन व्यवसाय करायला लागले आहेत. त्यामुळंच या बातमीच्या माध्यमातून महाराष्ट्रात किती प्रकारच्या गायी आहेत हे जाणून घेणार आहोत.
Etv Bharat
Published : Mar 7, 2024, 9:06 PM IST
गायींच्या सात प्रजाती खालीलप्रमाणे :
- खिल्लार गाय
- लाल कंधारी गाय
- साहिवाल गाय
- लाल सिंधी गाय
- गीर गाय
- ओंगोले गाय
- वेचूर गाय
- खिल्लार गाय: खिल्लार ही महाराष्ट्रातील लोकप्रिय गोवंशांपैकी एक असून, या गोवंशाला महाराष्ट्राची शान असं म्हणतात. या गोवंशाच्या गायी इतर गोवंशापेक्षा कमी दूध देतात अशी समजूत आहे. पण योग्यप्रकारे पैदास केल्यास यांचे दूध कमालीचे वाढते हे सिद्ध झालंय. या वंशाची गाय दिवसाला ३ ते ६ लिटर दूध देते.या खिल्लार गोवंशाचं दूध हे आरोग्यास उत्तम आहे. दिवसाला १० लिटर दूध देणाऱ्या देखील खिल्लार गायी पाहायला मिळतात.
- लाल कंधारी गाय : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात या गायीची निर्मिती झालीय. ही गाय महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणात आढळते. यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेती कामासाठी बैल उपयुक्त आहे.
- साहिवाल गाय : साहिवाल गाय हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील माउंटगोमेरी येथील उत्पत्ती आहे. ही प्रजाती भारतातील दूध उत्पादनात सर्वोच्च स्थानावर आहे. उष्ण वातावरणात सहज राहणारी आणि शांत स्वभावाची गाय आहे. दूध आणि शेती कामासाठी ही गाय उपयुक्त आहे.
- लाल सिंधी गाय : लाल सिंधी गाय ही साहिवाल गायीपेक्षा थोडी लहान आहे. तसंच इतर गायींपेक्षा ही गाय कमी दूध देते. लाल सिंधी गायीचा रंग गडद लालसर तपकिरी ते पिवळसर लाल रंगाचा असतो. दूध कमी देत असल्यानं शेती कामासाठी या गायीचा जास्त वापर केला जातो.
- गीर गाय : गीर गाय ही गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. याची दूध देण्याची क्षमता २०-२५ लिटर प्रतिदिन आहे. ब्राझीलमध्ये या गायीचं संवर्धन करून दूध देण्याची क्षमता ४०-५० लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवलेली आहे. अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीतील ही एक प्रजाती आहे. महाराष्ट्रातही ही गाय आता जास्त प्रमाणात आढळून येते. विदर्भ भागात या गायीचं प्रमाण जास्त असल्याचं सांगण्यात येतं.
- ओंगोले गाय :ओंगोले गाय ही पांढऱ्या रंगाची असते. या गायीची मान ही आखूड, राखाडी रंगाची असून, डोके मोठे आणि त्रिकोणी असते. या गायीचं कपाळ मोठे रुंद आणि भरीव असून त्यांचे डोळे मोठे आणि काळेभोर असतात. ही गाय भारताबाहेर पूर्व आफ्रिका आणि मेक्सिकोत बुल फाईटसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ओंगल गायीची विशेष काळजी घेतल्यास ही गाय जास्त प्रमाणात दूध देते.
- वेचूर गाय : केरळमध्ये आढळणारी ही गाय आता महाराष्ट्रातही आढळून येते. लहान आकारासाठी ही गाय ओळखली जाते, दुधात उच्च चरबीयुक्त सामग्री आणि गुणवत्तेसाठी वेचूर गायी प्रसिद्ध आहेत. शेती कामासाठीही या गायीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळं या गायीला चांगली मागणी आहे.
वरील सात गायी प्रामुख्यानं महाराष्ट्रात आढळतात. त्याशिवायही इतर अनेक गायींच्या प्रजाती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात आढळून येतात.