मुंबई Controversy in Mahayuti:लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. काही मतदारसंघांमध्ये आपल्या सहकारी पक्षांनी मदत केली नाही, त्यामुळंच आपला पराभव झाला, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यासह त्यांच्या बंधूवर मदत न केल्याचा आरोप केला आहे. सामंत यांच्यामुळचं मताधिक्य घटल्याचा दावा निलेश राणे यांनी केलाय. दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी राज्यातील चार ते पाच मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मदत केली नसल्याचा दावा केलाय. त्यामुळं आम्हाला पराभव पत्करावा लागला, असा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीतील शिवसेना-भाजपा या पक्षांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळं आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पराभवानंतर लिंबू टिंबू काहीही बोलतात : लोकसभा निवडणुकांच्या निकालावर आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये कुणी काम केलं, कुणी केलं नाही याबाबत सविस्तर चर्चा सुरू आहे. केवळ काही जण प्रसारमाध्यमासमोर येऊन अनावश्यक आरोप करत आहेत, अशा शब्दात भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी आपल्याच पक्षातील सहकारी नेत्यांचे कान टोचले आहेत. मात्र, विजयाचं श्रेय घेतात पराजयाला कुणीही वाली नसतो. त्याप्रमाणं जिथं पराभव झाला तिथं मतदान कमी झालं, अशा ठिकाणी दुसऱ्याला दोष देणं योग्य नाही. वस्तुस्थिती स्वीकारून काम केलं पाहिजं, असं पुरोहित म्हणााले. मात्र, शिवसेना-भाजपात कोणताही वाद नाही. आम्ही एकत्र काम करीत आहोत, यात कुठलीही बाधा येणार नाही, असंही राज पुरोहित यांनी सांगितलं.