छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Controversy In BJP Thackeray Group : आंदोलन करताना भाजपा विरुद्ध शिवसेनेचा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं मोठा तणाव निर्माण झाल्याचं क्रांती चौक भागात पाहायला मिळालं. एकीकडे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा आंदोलन करत असताना तिथे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलं गेलं. (Thackeray Group Agitation) यामुळे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं पोलिसांची दमछाक उडाली. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एकाच गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं भेदभाव केल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे.
भाजपानं केलं आंदोलन :भाजपा ओबीसी मोर्चातर्फे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतच्या वक्तव्याचा जोडे मारत निषेध करण्यात आला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसी जातीत झाला नसून ते ओबीसी नाहीत असं वक्तव्य केलं होतं. राहुल गांधींच्या या वक्तव्यातून जनतेत संभ्रम पसरवून ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, असा आरोप भाजपातर्फे करण्यात आला होता. या वक्तव्याचा निषेध करण्याकरिता छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. तसंच त्यांच्या फोटोला भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे मारत वक्तव्याचा निषेध केला.