मुंबई - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आपले 30 उमेदवार रिंगणात उतरवलेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हासुद्धा त्याचा हिस्सा आहे. मात्र, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाविरोधात रिंगणात उतरलाय. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसदेखील ही निवडणूक स्वबळावर लढवत आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी आणि एनडीए अशा दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्ष स्बवळावर रिंगणात उतरल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.
उशिरा यादी जाहीर करण्याचं कारण काय? :राष्ट्रवादी काँग्रेसने 30 जागांवर उमेदवार जाहीर केलेत. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असताना ऐन वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी यादी करून धक्कातंत्राचा अवलंब केलाय. आम्ही आधी उमेदवारी यादी जाहीर केली असती तर इतर पक्षांकडून आमच्या उमेदवारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता होती, त्यामुळे आम्ही आमच्या उमेदवारांना अगोदरच एबी फॉर्म दिले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमच्या 6 उमेदवारांनी अर्ज भरले, तर त्यापूर्वी 26 जणांनी अर्ज दाखल केले होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिलीय.
...म्हणून राष्ट्रवादीचा ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय :दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार सत्ताधारी आप पक्षाने रिंगणात उतरवलेत. त्या खालोखाल भाजपा आणि काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवलेत. या निवडणुकीत 30 जागांवरील उमेदवारांसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार उभे करण्यात चौथ्या क्रमांकावरील पक्ष असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिलीय. या निवडणुकीत भाजपासोबत लढण्याचा प्रस्ताव होता, मात्र दिल्लीत गांभीर्याने राजकारण करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया मजबूत करण्यासाठी आणि जनाधार वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितलं.
कोणत्या जागेवर कुणाला उमेदवारी ? | |
मतदारसंघ | उमेदवार |
बुरारी | रतन त्यागी |
बदली | मुलायम सिंह |
रिथाला | लखन प्रजापती |
मंगोल पुरी | खेमचंद बसवाल |
शालीमार बाग | मोहम्मद उस्मान |
चांदणी चौक | खालीदुर्र रहमान |
मातिया महल | मोहम्मद जावेद |
बल्ली मारन | मोहम्मद हारुन |
मोती नगर | सद्रे आलम |
मदिनापूर | हरीश कुमार |
हरी नगर | शब्बीर खान |
जनकपुरी | मोहम्मद नवीन |
विकासपुरी | हमीद |
नवी दिल्ली | विश्वनाथ अगरवाल |
कस्तुरबा नगर | सुरेंद्र सिंह हुड्डा |
मालवीय नगर | मोहम्मद समीर |
छतरपूर | मोहम्मद तंवर |
देवली | खेमचंद तंवर |
संगम विहार | कामर अहमद |
कालकाजी | जमीर |
तुघलकाबाद | प्रेम खटाना |
बदरपूर | इम्रान सैफी |
लक्ष्मी नगर | नमहा |
कृष्णा नगर | दानिश अली |
शाहदरा | राजेंद्र पाल |
सीमा पुरी | राजेश लोहिया |
रोहतास नगर | अभिषेक |
घोंडा | मेहक डोग्रा |
गोकलपूर | जगदीश भगत |
करवाल नगर | संजय मिश्रा |