चंद्रपूर Lok Sabha Election 2024 : काँग्रेसनं भावा-बहिणीला एका खाटेवर झोपवून अत्याचार केले, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. याविरोधात मंगळवारी शहरातील गांधी चौकात महिला काँग्रेसनं सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. या वक्तव्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आक्रमक झाल्यानंतर भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
भावा-बहिणींच्या पवित्र नात्यावर असभ्य भाष्य :चंद्रपूर लोकसभेतील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा झाली. यावेळी जनतेला संबोधतांना चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ-बहिणींच्या पवित्र नात्यावर असभ्य भाष्य केलं. याचे प्रतिसाद राज्यभर उमटत आहेत. मंगळवारी शहरातील गांधीं चौकात महिला काँग्रेसनं मुनगंटीवारांचा निषेध केला. "यापुढं बोलताना मुनगंटीवार यांनी खबरदारी घ्यावी," असा इशारा महिलांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात सभा :चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उमेदवार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण झालं. मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसवर खालच्या पातळीवर टीका केली. मुनगंटीवार यांच्या या भाषणाची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ही क्लिप लोकांपर्यंत पोहोचल्यानं आता जिल्ह्यातून या भाषणाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.