महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024; काँग्रेस बंडखोरांवर कारवाईचा बडगा: राजू झोडे, अभिलाषा गावतुरेंची हाकालपट्टी - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये उमेदवारी अर्ज भरलेल्या बंडखोरांवर काँग्रेस पक्षानं कारवाई केली आहे. चंद्रपुरातील राजू झोडे, अभिलाषा गावतुरेंची काँग्रेसमधून हाकालपट्टी करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2024, 7:03 AM IST

चंद्रपूर :पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांविरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा उमेदवारांना पक्षानं सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे. याबाबत काँग्रेस पक्षानं अधिकृत सूची जाहीर करत या कारवाईची घोषणा केली. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील राजू झोडे आणि डॉ अभिलाषा गावतुरे यांचा समावेश आहे.

अभिलाषा गावतुरे (Reporter)

काँग्रेस बंडखोरांवर कारवाईचा बडगा :काँग्रेस पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे राज्यात अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रपूर जिल्ह्यातील दोन ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी बंड पुकारलं. यामध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील राजू झोडे आणि बल्लारपूर क्षेत्रातील डॉ अभिलाषा गावतुरे यांचा समावेश आहे. चंद्रपूर विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या जागेवरून लढण्यासाठी राजू झोडे हे उत्सुक होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झोडे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना पाठिंबा देत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपलं जनसंपर्क कार्यालय देखील सुरू केलं. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी दिल्ली देखील गाठली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि या जागी काँग्रेसनं प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी दिली. यानंतर झोडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर बल्लारपूर क्षेत्रात देखील असंच चित्र निर्माण झालं. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ अभिलाषा गावतुरे मागील अनेक वर्षांपासून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना पाठींबा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या विधानसभा क्षेत्रातून त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी त्या प्रयत्नरत होत्या. मात्र त्यांच्या ऐवजी तिकीट जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांना जाहीर झालं. त्यामुळे गावतुरे यांनी एकला चलो रे चा नारा देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

बंडखोरांची यादी (Reporter)

विजय वडेट्टीवारांचा इशारा खरा ठरला :जिल्ह्यात दोन ठिकाणी बंडखोरी झाल्यानं या उमेदवारांनी अर्ज मागं घ्यावा, अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात येणार, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. अखेर काँग्रेस पक्षानं बंडखोर उमेदवारांविरोधात कारवाई केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं याबाबत बंडखोर उमेदवारांची नावं जाहीर केली. पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आली. राजू झोडे आणि डॉ गावतुरे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

राजू झोडे (Reporter)

वडेट्टीवारांकडून धानोरकरांवर मात : खासदार बाळू धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात असलेला वाद हा सर्वश्रुत आहे. जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रात तिकीट वाटपात विजय वडेट्टीवार यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं तर धानोरकर यांना यात यश आलं नाही. वरोरा विधानसभा क्षेत्रातून त्यांनी आपले भाऊ प्रवीण काकडे यांना तिकीट मिळवून दिलं, मात्र इतर ठिकाणी आपल्या समर्थकांना तिकीट मिळवण्यात यश आलं नाही. राजू झोडे आणि डॉ अभिलाशा गावतुरे हे धानोरकर यांचेच समर्थक मानले जातात. मात्र त्यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारली, मात्र पक्षानं त्यांना अखेर निलंबित केलं आहे.

हेही वाचा :

  1. परभणीत काँग्रेसचे बंडखोर सुरेश नागरे यांच्या घरावर पोलिसांची धाड
  2. Kasba Assembly By Election : काँग्रसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी शक्ती प्रदर्शन करत केला उमेदवारी अर्ज दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details