कल्याण काळे, काँग्रेस उमेदवार जालना Lok Sabha Election 2024 : अखेर जालना लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसनं डॉ कल्याण काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आता जालना लोकसभा मतदार संघात रावसाहेब दानवे यांना काँग्रेसचे डॉ कल्याण काळे यांचं कडवं आव्हान असणार आहे. जालना लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसला सोडण्यात आल्याचं घोषित करण्यात आल्यानंतर कोण उमेदवार असेल, याबाबत संभ्रम होता. मात्र काँग्रेस हायकमांडनं कल्याण काळे यांच्या नावाची घोषणा केल्यानं हा संभ्रम दूर झाला आहे. आता कल्याण काळे 2009 च्या पराभवाचा बदला घेणार का, अशी चर्चा करण्यात येत आहे.
काँग्रेसचे बडे नेते होते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार :लोकसभा मतदार संघासाठी अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झाली नव्हती. त्यामुळे मतदार संघातील कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मतदारांमध्ये संभ्रम होता. काँग्रेसचे बडे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत होते. मात्र काँग्रेसनं बुधवारी पत्रकार परिषद घेत जालन्याची जागेवर काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
कल्याण काळे घेणार का 2009 च्या पराभवाचा बदला :काँग्रेसकडून जालना लोकसभा मतदार संघात पुन्हा काँग्रेसचे माजी आमदार डॉ कल्याण काळे निवडणूक लढणार आहेत. डॉ कल्याण काळे यांनी 2009 मध्ये रावसाहेब दानवे यांना चांगलाच धक्का दिला होता. आता हाच पॅटर्न पुन्हा जालना लोकसभेमध्ये पाहायला मिळणार का, अशीच चर्चा सध्या जालना लोकसभा मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत आहे. तर भाजपाच्या गटातून सुद्धा उलट सुलट चर्चा सुरू असल्याचं चित्र जालना लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. "2009 मध्ये काँग्रेसची सत्ता होती, आता गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे डॉ कल्याण काळे यांना उमेदवारी मिळाल्यानं रावसाहेब पाटील दानवे यांना कसलाही परिणाम होणार नाही. उलट रावसाहेब दानवे भरघोस मतांनी विजयी होणार," अशी चर्चा सध्या मतदारसंघात जोर धरत आहे.
मनोज जरांगे यांना आमचा जाहीर पाठिंबा :यावेळी बोलताना जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे म्हणाले की, जालन्यामध्ये बऱ्याच समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी यावेळेस मतदार राजानं परिवर्तन करायचं आहे. काँग्रेसला भरघोस मतानं विजयी करायचं आहे. जालना शहराचा आणि जिल्ह्याचा कलंक पुसून टाकण्याच्या दृष्टीनं जर मला मतदारांनी लोकसभेत पाठवलं तर मी हा कलंक नक्कीच मिटवेल, अशी ग्वाही यावेळी डॉ कल्याण काळे यांनी दिली आहे. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले आहे, की "मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पाडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही पण जरांगे पाटील यांच्या बाजूनंच आहोत. या सर्व सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षणाचं फक्त गाजर दाखवलं आहे. तसेच जरांगे पाटील यांना सुद्धा आमचा जाहीर पाठिंबा आहे."
हेही वाचा :
- कल्याण काळेंच्या पराभवाने औरंगाबाद जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?
- Maratha Reservation Protest : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यापासून आमच्या जीवितास धोका, मराठा आंदोलकांचा आरोप
- Raosaheb Danve Attack On Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे पिंजऱ्यातला पोपट, मालक दिसल्यावरच 'टिव टिव' करतो; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल