पालघर Drunk Driver Mows Down College Professor : मागील काही दिवसांपासून राज्यात हिट अँड रन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला असून, याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. अशातच आता एका मद्यधुंद व्यक्तीनं चालवलेल्या कारनं धडक दिल्यामुळं महिला प्राध्यापिकेचा मृत्यू झालाय.
आरोपी अटकेत :पालघर जिल्ह्यातील अर्नाळा पोलिसांनी शुभम प्रताप पाटील नावाच्या २५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवताना धडक दिल्यानं एका कॉलेजच्या महिला प्राध्यापिकेचा मृत्यू झालाय, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.
फॉर्च्युनर गाडीनं दिली धडक :भरधाव वेगाने जाणार्या फॉर्च्युनर गाडीनं धडक दिल्याने महिला प्राध्यापिका आत्मजा कासाट यांचा मृत्यू झाला. विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीप येथे गुरूवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. गुरुवारी संध्याकाळी महाविद्यालय सुटल्यानंतर आत्मजा कासाट या विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशीप येथील आपल्या घरी चालत जात होत्या. पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या फॉर्च्युनर या आलिशान गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. प्राध्यापिका या विवा कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवत होत्या. त्या सामाजिक क्षेत्रात सक्रीय होत्या.
मद्यधुंद अवस्थेत कार चालवली : "अपघाताच्या वेळी कारचालक शुभम प्रताप पाटील हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची वैद्यकीय चाचणीत पुष्टी झाली. त्याला भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे," अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.
हेही वाचा -वरळीनंतर मुलुंड येथे हिट अँड रन: ऑडीने रिक्षाला दिली जोरदार धडक, चारजण जखमी - Mulund Hit And Run Case