मुंबईAmol Kirtikar : देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन झालं आहे. मात्र, मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात अवघ्या 48 मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला होता. तर, दुसरीकडं विरोधी महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना विजयी करण्यात आलं होतं. त्यामुळं मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांनी केला होता. निवडणूक अधिकाऱ्यांचा निकाल संशयास्पद असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. या प्रकरणाबाबत आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
फुटेज देणं नियमबाह्य : 4 जून रोजी उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणी पार पडली. तेव्हा, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अमोल कीर्तीकर आघाडीवर होते. दोन-तीन फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक होती. परंतु निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकचा वेळ घेतला. त्यामुळं निर्णय रात्री उशिरा घोषित केला. त्यामुळं मतमोजणी प्रक्रियेत गडबड झाल्याचं त्यांनी म्हटलंय. म्हणून मतमोजणीचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावं, अशी विनंती कीर्तीकरांनी निवडणूक अधिकाऱ्याकडं केली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज देणं आपल्या अधिकारात येत नसल्याचं म्हटलंय. त्यांनी कीर्तिकरांचा विनंती अर्ज मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडं पाठवलाय. यानंतर उपनगर जिल्हाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी मतमोजणी निकालाचं सीसीटीव्ही फुटेज देणं निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही. त्यामुळं ते उमेदवाराला देणं नियमबाह्य असल्याचं सांगितलंय.