नाशिक Cold Wave In Nashik: आठ-दहा दिवसापासून निफाड तालुक्यातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीने हैराण केलं आहे. गुरुवारी तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर पारा 4.4 अंशावर घसल्याची नोंद झाली आहे. हे या हंगामातील नीचांकी तापमान आहे. 2008 मध्ये निफाडचा पारा हा 0.7 अंशापर्यंत घसरला होता. तापमानात घसरण झाल्यानं द्राक्षाला मोठा धोका (Grapes Crop) निर्माण झाला आहे. तसेच कांदापात करपून जाण्याची भीती वर्तवली जात आहे. तर हंगामात प्रथमच तापमान इतके खाली घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला : उत्तर भारतातील शीतलहरीमुळं नाशिक जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या अखेर पासून हवामानात बदल झाला आहे. यामुळं द्राक्ष बागायतदार हैराण झाले आहेत. तापमानात घट होऊन थंडीत वाढ होत आहे. चालू द्राक्ष हंगामात 4.4 अंशावर पार घसरल्याने, द्राक्ष मण्यांना तडे जात आहेत. अति थंडीमुळं द्राक्ष घडांच्या पेशींचे कार्य मंदावत आहे. थंडी वाढल्यामुळं द्राक्ष बागेत शेकोटी पेटवून उब निर्माण केली जात आहे. मात्र दुसरीकडं गहू, कांदा, हरभरा या रब्बी पिकांसाठी हे वातावरण पोषक आहे.