महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटात कॉफी उत्पादन; चिखलदरा पाठोपाठ 84 वर्षानंतर 'कुकरू'च्या थंड हवेत बहरली कॉफीची बाग - Coffee Production

Coffee Production in Melghat : पाऊस म्हटलं की गरमागरम चहा किंवा फेसाळलेली कॉफी आणि भजी खायला कुणाला आवडणार नाही, बरोबर ना. धावपळीच्या दिवसात अनेकजण फ्रेश राहण्यासाठी कॉफी प्यायला जास्त प्राधान्य देतात. मात्र, महाराष्ट्रातही कॉफीची बाग आहे हे तुम्हाला माहीत आहेत का? महाराष्ट्रातील चिखलदराप्रमाणेच लगतच्या मध्यप्रदेशात येणाऱ्या कुकरू या ठिकाणी देखील कॉफी तयार केली जाते. जाणून घेऊया याचा इतिहास.

Coffee Production in Melghat at Chikhaldara and Kukru, know history about it
मेळघाटात कॉफी उत्पादन (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 7:04 PM IST

Updated : Aug 12, 2024, 7:40 PM IST

अमरावती Coffee Production in Melghat :विदर्भातील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात चिखलदरा या ठिकाणी 1820 मध्ये इंग्रजांनी कॉफी लागवडीचा पहिला प्रयोग केला. हा प्रयोग 1860 मध्ये पूर्णतः यशस्वी झाला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात कॉफी उत्पादनाचं चिखलदरा हे एकमेव केंद्र म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रातील चिखलदराप्रमाणे मध्यप्रदेशात येणाऱ्या 'कुकरू' या ठिकाणी देखील 1944 पासून कॉफीची बाग बहरलीय. परतवाडा आणि चिखलदरा या दोन्ही शहरापासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर चिखलदरा तालुक्यानं वेढलेलं मात्र मध्य प्रदेशात येणारं कुकरू हे देखील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. एकूणच मेळघाटातील कॉफीचा इतिहास आणि आजच्या परिस्थिती संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

मेळघाटातील कॉफी उत्पादनाचे ठिकाण (ETV Bharat Reporter)


मेळघाटात बहरली कॉफी :मेळघाटातील चिखलदरा हे समुद्रसपाटीपासून 3 हजार 664 फूट उंचीवर आहे. सर्वात आधी 1820 मध्ये इथं कॉफी लागवडीचा प्रयोग केला. मात्र, खऱ्या अर्थानं 1860 मध्ये मुल्हेरन कॉटेज या इंग्रज अधिकाऱ्यानं आपल्या बंगल्याच्या परिसरात कॉफी लागवडीद्वारे हा प्रयोग यशस्वी केला. मुल्हेरन कॉटेज यांनी केरळमधून कॉफीची रोपं आणली. 1860 ते 1861 अशी वर्षभर या कॉफीच्या झाडांची त्यांनी निगा राखली. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि चिखलदराच्या मातीत कॉफी रुजू शकते हे सिद्ध झालं. त्यानंतर 1997 ते 98 दरम्यान रोमन कॅथोलिक मिशनरीची सुरुवात चिखलदरा लगत सुरू झाली. यावेळी त्या ठिकाणी असणारे फादर भेवनेट यांनी आजच्या मरियमपूर या गावालगत सर्वात आधी कॉफी लागवडीच्या माध्यमातून या परिसरातील आदिवासी बांधवांसाठी रोजगार निर्मिती केली. मरियमपूर परिसरात एकूण शंभर एकरात कॉफीची लागवड करण्यात आली. या परिसरात कॉफीचे उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ लागल्यावर कॉफी उत्पादनासाठी शेतजमीन क्षेत्र वाढायला लागलं. इंग्रजांच्या काळात चिखलदरा येथील कॉफी तत्कालीन मद्रास येथील पोलसन कंपनीकडं पाठवली जायची. 1965 पर्यंत चिखलदरा इथून कॉफीचे ट्रक देशाच्या विविध भागात जायचे. आज पुन्हा एकदा कॉफी उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात चिखलदरा येथील आदिवासी बांधव मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करताय.

कुकरू येथील कॉफीचं वैशिष्ट्य : भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांकडून मेळघाटातील चिखलदरा येथे कॉफी उत्पादन वाढलं आणि देशभरात चिखलदराची कॉफी पोहोचायला लागली असतानाच 1944 मध्ये फ्लोरेन्स हॅन्ड्रीक्स या इंग्रज महिलेनं कुकरू या थंड हवेच्या ठिकाणी कॉफीची बाग फुलवली. चिखलदरा ते चुरणी या महाराष्ट्रातील गावांना जोडणाऱ्या मार्गावर मध्यप्रदेश राज्यातील कुकरू आणि खांबला ही गावं आहेत. चिखलदराप्रमाणेच कुकरूचं वातावरण देखील कॉफीसाठी योग्य आहे. यामुळंच या ठिकाणी एकूण 44 हेक्टर क्षेत्रात फ्लोरेन्स हॅन्ड्रीक्स यांनी लावलेली कॉफीची बाग आज देखील मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात भैसदेही तालुक्यात वनविभागाच्या वतीनं जोपासली जात आहे.

कुकरूला अडीच लाख रुपयांचं उत्पन्न :फ्लोरेन्स हॅन्ड्रीक्स या इंग्रज महिलेनं कुकरू येथे साकारलेल्या कॉफीच्या बागेतून सध्या दोन ते अडीच लाख रुपये इतकं वार्षिक उत्पन्न मिळतं. वनविभागानं या कॉफी उद्यानाची जबाबदारी कुकरू गावातील ग्रामस्थांच्या समितीकडं बहाल केली आहे. या ग्राम समितीच्या माध्यमातून या बागेचं संवर्धन केलं जातं. आंब्यांसह अनेक वृक्षांच्या मध्ये एखादं दाट जंगल वाटावं अशी ही बाग आहे. या बागेतील कॉफी चिखलदरा येथे पुढील सर्व प्रक्रियांसाठी पाठवली जात असल्याची माहिती या बागेच्या संवर्धन समितीचे सदस्य विकास चिलाटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना कॉफीचं रोपट आम्ही विकत देतो असं देखील चिलाटे यांनी सांगितलं.

कुकरू आहे पर्यटन केंद्र :चिखलदराप्रमाणे कॉफी उद्यान असणारं मध्य प्रदेशातील कुकरू हे थंड हवेचं ठिकाण छान असं पर्यटन केंद्र देखील आहे. 1906 मध्ये इंग्रजांनी या ठिकाणी आजूबाजूला दोन दऱ्या असणाऱ्या पहाडावर छानसं विश्रामगृह उभारलं. आज या विश्रामगृहाच्या परिसरात मध्य प्रदेश वन विभागाच्या वतीनं अनेक पर्यटन संकुल उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटकांची अधिक गर्दी पाहायला मिळते.

मेळघाटातील कॉफीवर वर्धा येथे संशोधन :मेळघाटात चिखलदरा या ठिकाणी वनविभागाच्या कॉफीच्या दोन मोठ्या बागा आहेत. यासह काही खासगी व्यक्ती देखील आपल्या शेतात कॉफीचं उत्पन्न घेत आहेत. आमझरी या पर्यटन संकुल परिसरात कॉफीची नुकतीच दोन लाख वृक्ष लागवड करण्यात आली. कुकरू येथील कॉफी देखील चिखलदऱ्याला येते. या कॉफीची प्रोसेसिंग युनिट चिखलदऱ्यात आहेत. मेळघाटातील या कॉफीद्वारे अंघोळीच्या साबणाची निर्मिती देखील करण्यात आली. साबणासोबतच कॉफीचा आणखी नवा प्रयोग काय करता येऊ शकतो यासाठी वर्धा येथील महात्मा गांधी संशोधन केंद्रामध्ये विविध प्रयोग केले जात असल्याची माहिती मेळघाट कॉफी आणि मेळघाट हनीचे संचालक सुनील भालेराव यांनी दिली.

हेही वाचा -

  1. छत नसलेलं 'आनंदेश्वर' मंदिर आहे आश्चर्याचा खजिना, श्रावण सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी - Anandeshwar Mahadev Temple
  2. सावळापुरात 1861 साली सापडली 'सत्यनारायणाची मूर्ती'; दर्शनासाठी आले होते अक्कलकोटचे 'स्वामी समर्थ', जाणून घ्या मूर्तीचं रहस्य
  3. इमादशाही राजवटीत उभारला 'हौज कटोरा'; सव्वा पाचशे वर्षे जुन्या इमारतीवर इराणी शैलीची छाप - Houj Katora Amravati
Last Updated : Aug 12, 2024, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details