मुंबई CM Shinde On Budget 2024 :अर्थसंकल्पाबाबत पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशात गेल्या 50-60 वर्षांत जे निर्णय झाले नाहीत ते मागील मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात झाले आहेत आणि आता ते अर्थसंकल्पात दिसून येत आहेत. (Budget 2024) मोदी सरकारची कामाची पद्धत आणि सरकारने घेतलेले निर्णय त्याचे फलित अर्थसंकल्पातून दिसत आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, तरुण आणि गोर-गरीब यांचा विचार करण्यात आला आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण :मोदी सरकारनं आपल्या सरकारच्या काळात समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला आहे. दारिद्र्य रेषेखालील 25 हजार कोटीपेक्षा अधिक गोरगरिबांना दारिद्र्यरेषेखालून मोदी सरकारनं बाहेर काढलं आहे. तसंच महिलांसाठी आरोग्य विभागात देखील महत्त्वपूर्ण निर्णय बजेटमध्ये घेण्यात आले आहेत. त्यामुळं हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आणि अतिशय चांगला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
रोटी, कपडा आणि मकान देणारा अर्थसंकल्प :पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या अर्थसंकल्पात महिलांबरोबर लहान मुलींसाठीही महत्त्वपूर्ण योजना आणण्याचा सरकारचा विचार आहे. महिलांसाठी लखपती योजना किंवा आर्थिक बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात दिसताहेत. याच बरोबर कोविड काळात 80 कोटी गरिबांना धान्य वाटप केले. पंतप्रधान आवास योजनेमार्फत 2 कोटी नवीन घरांची मोदी सरकारच्या काळात निर्मिती करण्यात आली. आता याच पंतप्रधान आवास योजनेमध्ये आणखी घरांची निर्मिती होणार आहे. थोडक्यात काय तर सर्व घटकांचा विचार करून, मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे रोटी, कपडा आणि मकान आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.