OBC reservation : वडीगोद्री येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण करत आहेत. आज राज्यसरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. मात्र लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशिवाय गिरीश महाजन, संदिपान भुमरे, अतुल सावे आणि उदय सामंत हे आंदोलनस्थळी उपस्थित होते.
मुंबईत आज बैठक : यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. आज सायंकाळी मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आता या बैठकीमध्ये काय चर्चा होणार? सरकार काय निर्णय घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही : ''कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच सरकारची भूमिका असून या भूमिकेत कधीही बदल होणार नाही. सरकारच्या भूमिकेवर विश्वास ठेवून उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घ्यावं, तसंच महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सहकार्य करावं, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन यावेळी केली.''