नागपूर CM Eknath Shinde : विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दाढीचाही उल्लेख केलाय. "दाढी खेचून आणली असती म्हणणाऱ्यांना सांगतो, ही दाढी इतकी हलकी आहे का? या दाढीनं काडी फिरवली तर आपली उरलीसुरली लंका जळून खाक होईल", असं म्हणत नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. तसंच, ''माझ्या नादाला लागू नका, मी कुणाला अडवं जात नाही. मात्र, मला कुणी आडवं आलं तर मी कोणाला सोडतही नाही'', असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. ते रविवार (11 फेब्रुवारी) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे शिवसेनेच्या आयोजित शिवसंकल्प अभियानात (Shiv Sankalp Abhiyan) बोलत होते.
घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही : रामटेक येथे शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. आपण करत असलेल्या विकास कामांबाबत सतत टीका करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी जाहीर सभेतून शिवसेना 'स्टाइल'नं जोरदार प्रहार केलाय. उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. ''मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही, रस्त्यावर उतरून काम करणारा आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधणारा आहे, कार्यकर्त्यांना भेटणारा आहे, त्यांच्याशी बोलणारा आहे. मी फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही", असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. तसंच, "जे घरी बसतात त्यांना कायमचं घरी बसवण्यासाठी 45 पेक्षा अधिक खासदार महाराष्ट्रातून निवडून आणण्याचा शिवसंकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे", असंही ते यावेळी म्हणाले.
जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं : "काही लोक श्री रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करतात. आम्ही अयोध्येला जात होतो. मात्र, आमच्या बॅगा विमानातून काढायला लावल्या होत्या", असं म्हणत उद्धव ठाकरेंमुळं आपल्याला श्री रामाचं दर्शन घेता आलं नाही, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केलीय. 'जो राम का नहीं, वो किसी काम का नहीं' असा डायलॉगही मारत शिंदे म्हणाले, "श्रीरामाच्या आशीर्वादानं आमचं सरकार आलं. त्यानंतर ठाकरेंकडून सातत्यानं पक्ष चोरला, बाप चोरला असा आरोप होतो. मात्र, बाळासाहेब चोरायला काय ते एखादी वस्तू आहेत का"? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राष्ट्रपती राजवट का? : "काही लोकं म्हणतायत की राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, पण राष्ट्रपती राजवट का आणि कशासाठी लावा? सरकार कोणताही गुन्हा करणाऱ्याला पाठीशी घालणार नाही, तुमच्या काळात हनुमान चालीसा म्हंटली म्हणून जेलमध्ये घातले, केंद्रीय मंत्र्यांना ताटावरून उठवून अटक केलं. गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला तरीही राष्ट्रपती राजवट लावली नाही, मग आता काय झालं?" असा सवाल यावेळी एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना विचारला.