नाशिक Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभेवरुन सध्या महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. "नाशिकमधून माझी उमेदवारी फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूरमधून लढता का? असं विचारलं. शिरूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. मी शिरूरमधून निवडणूक लढवली, तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता, मात्र, मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही," असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. असा दावाही याआधी खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. त्यावरुन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलंय.
मी नाशिकसाठी काम करणार : "माझ्या तोंडात चुकीचे शब्द घालू नका. मी कशाला तिकडं जाईन. मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, भुजबळ हे नाव नाशिकसाठी दिल्लीतून फायनल झालं होतं. पण, मुख्यमंत्री शिंदे यांना अडचण होती. त्यांना नाशिकची जागा हवी होती, म्हणून त्यांनी मला शिरुरमध्ये ओबीसी, माळी समाज जास्त आहे, तुम्ही तिथून लढता का?, असं विचारलं होतं. त्यांचा हेतू स्पष्ट होता, मी तिकडं गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल, पण मी सांगितलं की ओबीसी समाज महाराष्ट्रभर आहे. माझा संबंध नाशिकशी आहे, मी नाशिकचा पालकमंत्री आहे. त्यामुळं या पुढे मी नाशिकसाठी काम करत राहणार," असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
नाशिकसाठीच काम करणार : "नाशिक सोडून मी कुठेही उभा राहणार नाही. त्यामुळं शिरूरला लढण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षानं सांगितलं म्हणून मी नाशिकला तयार झालो होतो. मला तशी अनेक ठिकाणी मागणी होती. सभा जिथे जिथे झाल्या तिथून उभे राहा, अशी मागणी होती. पण नाशिक मिळालं, तर ठीक नाहीतर नाशिकसाठी काम सुरू आहे," असंही भुजबळ यांनी स्पष्टपणं सांगितलं.