मुंबई : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात बुधवारी तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतली आहे. या प्रकरणी सरकार अॅलर्ट मोडवर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. त्यांना गंभीरपणे तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वारगेट स्थानकाचे स्थानक व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुखाची चौकशी करुन दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. या स्थानकात तैनात असलेल्या 23 सुरक्षारक्षकांना हटवून नवीन सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी गुरुवारी दुपारी 12 वाजता महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्रालयात तातडीनं बैठक बोलावण्यात आल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
विभागीय चौकशी करणार : स्वारगेट बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणीवर अज्ञात व्यक्तीकडून अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रताप सरनाईक यांनी संबंधित बसस्थानकावरील कार्यरत असलेले स्थानकप्रमुख आणि आगार व्यवस्थापक यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावं, असे निर्देश उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनराव यांना दिले आहेत.