मुंबई Mira Bhayandar Clash : मुंबईजवळील मीरा-भाईंदर येथे रविवारी (21 जानेवारी) एका वाहन रॅलीदरम्यान दोन समुदायांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
टोळक्यानं रॅली काढली : सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर, रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास मीरा-भाईंदर पोलिसांच्या हद्दीतील नया नगर येथे 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं तीन कार आणि मोटारसायकलवरून रॅली काढली होती. या टोळक्यानं प्रभू रामाच्या नावाची घोषणाबाजी सुरू केली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली :घोषणाबाजी करत असताना, काही व्यक्तींनी फटाके फोडले. त्यानंतर स्थानिक लोकांचा एक गट लाकडी दांडके घेऊन बाहेर आला. त्यांनी टोळक्यासोबत वाद घातला आणि त्यांच्या वाहनांवर हल्ला केला. एका पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. यावेळी वाहनांवरून जाणाऱ्या लोकांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केल्यानं हल्लेखोर पसार झाले. यापुढे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. यावेळी स्थानिक पोलिस कर्मचार्यांव्यतिरिक्त, दंगल नियंत्रण पोलिस (आरसीपी) ची एक पलटणही तैनात करण्यात आली होती.