नागपूर CJI DY Chandrachud : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे त्यांच्या कठोर निर्णयांमुळं आणि टिप्पण्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळी वकिलांच्या कृतीवर भाष्य करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी चिंता व्यक्त केलीय. ते म्हणाले की, "न्यायपालिकेचे खांदे रुंद आहेत आणि ती टीका तसंच प्रशंसा स्वीकारु शकते, परंतु वकिलांनी प्रलंबित प्रकरणं किंवा निर्णयांवर भाष्य करणं अत्यंत चिंताजनक आहे."
बार ही संस्था आवश्यक : सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, "बारचच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी न्यायालयीन निर्णयांवर प्रतिक्रिया देताना हे विसरु नये, की ते न्यायालयाचे अधिकारी आहेत. सामान्य लोक नाहीत." नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनच्या शताब्दी वर्षाच्या समारंभात सरन्यायाधीश बोलत होते. "न्यायालयीन स्वातंत्र्य, संवैधानिक मूल्यं आणि न्यायालयाच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी बार ही संस्था म्हणून आवश्यक आहे," असं ते म्हणाले.
बार सदस्यांनी न्यायालय आणि संविधानाशी एकनिष्ठ राहावं : पुढं बोलताना सरन्यायाधीश म्हणाले, "न्यायपालिका आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि पक्षनिरपेक्षतेसाठी, कार्यकारिणीपासून सत्ता वेगळी आणि निहित राजकीय स्वार्थासाठी वारंवार पुढं आलीय. न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आणि बारचं स्वातंत्र्य यांचा खोलवर संबंध आहे हे आपण विसरु नये. न्यायपालिकेचं स्वातंत्र्य, घटनात्मक मूल्यं आणि न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी बारचं एक संस्था म्हणून स्वातंत्र्य आवश्यक आहे. चैतन्यपूर्ण आणि तर्कसंगत लोकशाहीमध्ये बहुतेक लोकांची राजकीय विचारधारा किंवा कल असतो. माणूस हा राजकीय प्राणी आहे, असं ॲरिस्टॉटलनं म्हटलं होतं. वकीलही त्याला अपवाद नाहीत. तथापि, बारच्या सदस्यांसाठी, एखाद्याची सर्वोच्च निष्ठा पक्षपाती हिताशी नसून न्यायालय आणि राज्यघटनेशी असायला हवी."
न्यायालयाचे निर्णय सार्वजनिक मालमत्ता : सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचे निर्णय हे कठोर कार्यवाही, सर्वसमावेशक न्यायिक विश्लेषण आणि घटनात्मक तत्त्वांशी बांधिलकीचे परिणाम आहेत. पण एकदा निर्णय सुनावला की, ती सार्वजनिक मालमत्ता आहे. संघटना म्हणून आमचे खांदे रुंद आहेत. आम्ही प्रशंसा आणि टीका दोन्ही स्वीकारण्यास तयार आहोत." तसंच "बार असोसिएशनचे सदस्य आणि पदाधिकारी असल्यानं वकिलांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सर्वसामान्यांप्रमाणे भाष्य करु नये," असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा :
- 'टीकेला सामोरं जाण्यासाठी आमचे खांदे मजबूत', सर्वोच्च न्यायालयानं असं का म्हटलं? जाणून घ्या सविस्तर
- उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; 'या' डीजीपीला हटवण्याच्या आदेशाला स्थगिती