मुंबईDhananjaya Chandrachu :मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नवीन इमारतीचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आलं. नवीन उभारण्यात येणारी इमारत पुढील 100 वर्षे पक्षकार, वकील आणि न्यायपालिकेला योगदान देईल, असा विश्वास सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केलाय.
न्यायालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन: मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे वांद्रे येथे भूमिपूजन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्या. अभय ओक, न्या.दीपांकर दत्ता, न्या. उज्जल भुयाण, न्या. प्रसन्ना वराळे, अतिरिक्त सॉलिसीटर जनरल देवांग व्यास, राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय म्हणाले सरन्यायाधीश ? :न्यायालयाचं काम वाढल्यानं जागेची गरज वाढली आहे. नवीन आव्हाने आणि उद्दिष्टे यांचा विचार करता नवीन अत्याधुनिक इमारत काळाची गरज आहे. डिजिटायजेशन, पेपरलेस कोर्ट, न्याय आपल्या दारी या सर्वांचा विचार करता नवीन इमारत मोठी आणि अद्ययावत असणं सर्वांसाठी सोयीचं ठरेल. आजचा दिवस मुंबई उच्च न्यायालयाच्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असं धनंजय चंद्रचूड म्हणाले.
"मुंबई उच्च न्यायालयानं माझ्या करिअरला मोठं वळण दिलं आहे. या न्यायालयाच्या प्रांगणात नवोदित वकील म्हणून मी फिरलो आहे. नवीन इमारतीच्या भूमिपूजनापूर्वी विद्यमान हेरिटेज इमारतीला नमन करणं महत्त्वाचं आहे. न्यायालय इमारतीच्या प्रत्येक कोपऱ्याची आपली आठवण आहे". - धनंजय चंद्रचूड, सरन्यायाधीश
न्यायपालिकेतील डिजिटल सुविधा वाढवण्याची गरज: न्यायपालिकेत मोठ्या संख्येने महिला वकील आणि महिला न्यायाधीशांचे प्रमाण वाढीस लागले आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त मुली या क्षेत्रात येत आहेत. महिलांना सवलत नको तर त्यांना समानता पाहिजे. न्यायपालिकेतील डिजिटल सुविधा वाढवण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे प्रत्येक भाषेत भाषांतर करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार सुमारे 2 हजार पेक्षा जास्त निकालांचे मराठीत भाषांतर करण्यात आलं आहे. तर 37 हजार पेक्षा जास्त निकालांचे हिंदी भाषेत भाषांतर करण्यात आलं आहे. आम्ही जे काम करतोय ते ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. नवोदित वकिलांना लॉ रिपोर्ट देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे, असं चंद्रचूड म्हणाले. बॉम्बे डिजिटल लॉ रिपोर्ट सारखे उपक्रम वाढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय.
न्यायपालिकेचा इतिहास जाणून घेण्याचीसंधी : मुंबई उच्च न्यायालयाला अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील निवाड्यांचा इतिहास आहे. नवीन इमारतीच्या निमित्ताने आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे मार्गस्थ होत आहोत. मात्र, असं असताना दक्षिणेकडं पूर्णतः पाठ फिरवली जाणार नाही, याची दक्षता घेणे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी भेट देऊन न्यायपालिकेचा इतिहास जाणून घेण्याची संधी मिळेल. लोकमान्य टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी उद्गारलेले वक्तव्य अजून स्मरणात आहे. आणिबाणीच्या काळात मुंबई उच्च न्यायालचाच्या न्यायमूर्तींनी त्यांच्या करिअरचा विचार न करता स्वात्रंत्र्यासाठी आवाज उठवला, याकडं धनंजय चंद्रचूड यांनी लक्ष वेधलं.
'दिल चाहता है' च्या गाण्याने भाषणाचा समारोप: "कोई कहे, कहता रहे, हम हैं नए, अंदाज क्यों हो पुराना", या दिल चाहता है चित्रपटाच्या गाण्याच्या ओळी ऐकवून सरन्यायाधीशांनी भाषणाचा समारोप केला. न्यायालयाची इमारत वांद्रे येथे होत असल्यानं उच्च न्यायालय बॉलीवूडच्या अधिक जवळ आली असल्याचा उल्लेख त्यांनी केलाय.
न्यायालयाचा इतिहास प्रेरणादायी :उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निर्भिडपणे काम करतात. मात्र, जेव्हा न्यायपालिकेत अधिक सुविधा पुरवण्याची गरज असते त्यावेळी सरकार आणि न्यायपालिकेमध्ये समन्वयाचे काम करतात असे कौतुकोद्गार त्यांनी काढले. नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले. 14 ऑगस्ट 1862 रोजी इमारतीचे काम सुरु झाले. 17 वर्षांनी सध्याच्या इमारतीत स्थलांतरीत झाले. तब्बल 150 वर्षांच्या इतिहासात अनेक बदल पाहिले. या न्यायालयाचा इतिहास प्रेरणादायी आहे. या न्यायालयाने अनेक राष्ट्रीय नेते दिले आहेत. यामध्ये महात्मा गांधी, भारतरत्न ड़ॉ आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, के. मुंशी, भारतरत्न पी व्ही काणे यांचा समावेश आहे.