पालघर - कोविडच्या काळात औषध खरेदी, शवपेट्या खरेदीत पैसे खाल्ल्यामुळेच त्यांच्या बॅगा चेक होत असाव्यात, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. राज्य सरकार पैसे खाणारे नसावे, घर भरणारे नसावे, तर लोकांच्या घरात आनंद निर्माण करणारे असावे, अशा पद्धतीनं आमचं काम सुरू असून महाराष्ट्रात सामान्य माणसांना सुपरमॅन बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर पालघर हा आता ग्रामीण भाग राहणार नसून ते महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं. तर ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीकेचे वाग्बाण सोडले. यावेळी आमदार श्रीनिवास वनगा, केदार काळे, कुंदन संखे, भरत राजपूत, वैदेही वाढान, आनंद ठाकूर उपस्थित होते.
सर्वच लाडके विरोधकांना सत्तेची दारे बंद करणार - यावेळी शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे, म्हणून लाडकी बहीण योजना बंद पडण्यासाठी सावत्र भाऊ आणि दुष्टभावांनी प्रयत्न केला. त्यासाठी ते न्यायालयात गेले; परंतु न्यायालयाने त्यांना हुसकावून लावले. दीड हजार रुपयात बहिणींना विकत घेता का, अशी आमच्यावर टीका करून त्यांनी लाडक्या बहिणीचा अपमान केला. आता या लाडक्या बहिणी विरोधकांना सत्तेची दारं कायमची बंद करणार आहेत, असा विश्वास व्यक्त करताना यापूर्वीच्या योजनेत ज्या लाडक्या बहिणी वंचित राहिल्या आहेत, त्यांनाही आमचं सरकार आल्यानंतर वंचित ठेवणार नाही, असं शिंदे यांनी सांगितलं.
सर्वच मुलींना उच्च शिक्षण मोफत - राज्य सरकार हे जनतेच्या आशा आकांक्षांचा विचार करून काम करणारे असायला हवे, असं सांगताना शिंदे यांनी एक उदाहरण दिलं. रात्री एक वाजता टीव्हीवर बातमी पाहिली. त्यात पैसे नसल्याने एका मुलीनं शिक्षण घेता येत नाही, म्हणून आत्महत्या केली. या घटनेनं आपल्या मनाला खोल वेदना झाल्या. त्याचवेळी आपण उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगून राज्यातील सर्व मुलींच्या उच्च शिक्षणाचा खर्च सरकार करणार असल्याचं सांगून तशी घोषणा करायला लावली, असं ते म्हणाले.
मला हलक्यात घेतले, म्हणून तुमचे टांगे पलटी -राज्यात लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या बहिणी, लाडके वृद्ध अशा सर्वांचीच सरकार काळजी घेत असून त्या प्रत्येकाने आता विरोधकांना कायमचं घरी बसवण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा शिंदे यांनी केला. आमच्या योजनांमुळे विरोधकांना कुठेच काही संधी दिसेना, म्हणून त्यांनी योजनांची बदनामी सुरू केली. आमच्या योजनांची चौकशी लावू, दोषी आहे त्यांना तुरुंगात धाडू अशी भाषा त्यांनी सुरू केली; परंतु बाळासाहेबांच्या विचाराने तयार झालेला हा एकनाथ शिंदे तुमच्या पोकळ धमक्यांना भीत नाही, असा इशारा देऊन शिंदे म्हणाले की, तुम्ही मला हलक्यात घेतले. त्यामुळे तुमचा टांगा पलटी घोडे फरार झाले आणि तुम्ही ठरवले, तरी शेतकरी, लाडकी बहीण, लाडके ज्येष्ठ अशांसाठी मी केव्हाही तुरुंगात जायला तयार आहे. विरोधक दुतोंडी साप असून त्यांना आता या लाडक्या बहिणी वीस तारखेला कडकलक्ष्मी होऊन विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
सरकारमध्ये पैसे खाणारे जेलमध्ये - काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांमध्ये घोषणा केल्या; परंतु त्या घोषणा पूर्ण करण्यासाठी आता त्यांच्याकडे पैसेच नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भीक मागत सुटले आहेत, अशी टीका करून खटाखट पैसे देणारे आता कोठे आहेत, असा सवाल शिंदे यांनी केला. आम्ही मात्र लाडक्या बहिणींना फटाफट पैसे दिले, असं त्यांनी सांगितलं. यापूर्वी सरकारमध्ये असताना ज्यांनी पैसे घेतले, ते जेलमध्ये गेले. आम्ही मात्र लोकांच्या हप्त्याचे पैसे भरणारे आहोत, पैसे देणारे आहोत, पैसे घेणारे नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.