मुंबई Chhota Shakeel Brother-in-law Died : कुख्यात गुंड छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेख उर्फ भाईजान याचं सर जे. जे. रुग्णालयात निधन झालं. फेब्रुवारी 2022 मध्ये मीरा रोड इथून एनआयए या केंद्रीय तपास संस्थेनं त्याला अटक केली होती. छातीत दुखत असल्यानं त्याला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जे. जे. रुग्णालयात मृत्यू : आरिफ भाईजान हा कुख्यात गुंड छोटा शकीलचे मुंबई तसंच महाराष्ट्रातील सर्व व्यवहार सांभाळत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आरिफला शुक्रवारी (21 जून) सायंकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला तुरुंग प्रशासनानं सायंकाळी 7 वाजता मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल केलं होत. उपचार सुरू असताना सायंकाळी 7:30 वाजता त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
टेरर फंडींग प्रकरणातील प्रमुख आरोपी : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) 3 फेब्रुवारी 2022 रोजी दाऊद, त्याचा भाऊ अनीस आणि छोटा शकील यांच्यासह इतरांविरुद्ध शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थ-दहशतवाद, मनी लाँड्रिंग, बनावट भारतीय नोटा चलनात आणल्यासह इतर आरोपांबद्दल गुन्हा दाखल केला. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) दाऊद इब्राहिम टोळीच्या विरोधात टेरर फंडिंग प्रकरणातील प्रमुख आरोपी आरिफ अबुबकर शेख उर्फ भाईजानचं मीरा रोड येथील निवासस्थान जप्त केलं. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मीरा रोड (पूर्व) येथील मंगल नगर भागातील गौरव ग्रीन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील सदनिका ताब्यात घेतली. बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967 च्या कलम 25 (1) अंतर्गत हा फ्लॅट जप्त करण्यात आला होता, असं NIA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
2022 मध्ये तपास एजन्सीनं छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान, त्याचा भाऊ शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट या तीन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर दहशतवादी कारवायांसाठी फंड उभारण्यासाठी डी कंपनीच्या नावावर प्रॉपर्टीचे व्यवहार आणि वाद मिटवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात सक्रिय भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आला होता.
हेही वाचा -
- पाकिस्तानच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नरसीचा तरुण; देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयातून सूरत पोलिसांनी घेतलं ताब्यात - Youth Arrest From Narsi
- भाजपात घरवापसी करण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना धमकी; दाऊद, छोटा शकील टोळीकडून अमेरिकेतून आला फोन - Eknath Khadse
- साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी, छोटा शकीलचा साथीदार रियाज भाटी विरुद्ध गुन्हा दाखल